पुण्यात मनसेचे कार्यालय पेटवून देण्याचा केला प्रयत्न; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 October 2019

णे : कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी परिसरात असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना डहाणूकर कॉलनीतील पक्षाच्या कार्यालयामध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी घडली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पुणे : कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी परिसरात असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना डहाणूकर कॉलनीतील पक्षाच्या कार्यालयामध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी घडली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सलग दुसऱ्यांदा मनसेचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते हेमंत संभूस (वय 46, रा. कोथरुड) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनीमध्ये रस्त्याच्याकडेला स्वयंभू प्रतिष्ठान व मनसेचे कार्यालय आहे. 21 ऑक्‍टोबरला मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत संभूस व त्यांचे कार्यकर्ते कार्यालयात होते. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक व महिलांशी संवाद साधल्यानंतर सर्वजण निघून गेले. त्यानंतर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी कार्यालयाला आग लावून तेथून पळ काढला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी संभूस यांच्यासह अग्निशामकदलास दिली. जवानांनी काही मिनीटातच आग आटोक्‍यात आणली. त्यामध्ये कार्यालयातील महत्वाच्या फाईल्स, फायबर पत्रा व अन्य वस्तु जळाल्या. 

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी निवडणूक लढवित जोरदार टक्कर दिली होती. त्या रागातून अनोळखी व्यक्तींनी जाणीवपुर्वक मनसेच्या कार्यालयास पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची शक्‍यता संभूस यांनी व्यक्त केली.

मनसेचे कार्यकर्ते घेणार आरोपीचा शोध 
मनसेचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न यापुर्वीही एकदा झाला होता. त्यावेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी पोलिसांकडे अर्ज सादर करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार घडला, त्यामुळे हा प्रकार करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against Attempt to set fire to MNS office in Pune