प्राण्यांचे हाल केल्याचा राजू शेट्टी यांच्यावर बारामतीत गुन्हा  

मिलिंद संगई
Friday, 28 August 2020

पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी राजू शेट्टी यांना मोर्चाला परवानगी नसल्याची नोटीस बजावली होती. मोर्चा काढू नये, असे आवाहन केले होते. मात्र, तरीही मोर्चा काढण्यात आला.

बारामती (पुणे) : दूध दर वाढीच्या मागणीसाठी बारामतीत मोर्चा काढल्यानंतर आता माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 40 ते 50 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोर्चा निर्विघ्नपणे पार पडला असला, तरी राजू शेट्टी व सहकाऱ्यांना आता पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, परवानगी नसताना मोर्चा काढणे, प्राण्यांचे हाल करणे, विनामास्क वावर यासाठी बारामती शहर पोलिसांनी राजू शेट्टी, अमरसिंह कदम, विलास विनायक सस्ते, महेंद्र जयसिंग तावरे, विकास उर्फ नानजी बाबर, धनंजय महामुलकर, सचिन खानविलकर, डॉ. राजेंद्र घाडगे, बाळासो शिपकुले, सिवाजी सोडमिसे, राजाभाऊ कदम, बुधम मशक शेख व अन्य 40 ते 50 स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी ओंकार सिताप यांनी फिर्याद दिली आहे. 

बारामतीकरांसाठी मोठी बातमी, टोलबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी राजू शेट्टी यांना मोर्चाला परवानगी नसल्याची नोटीस बजावली होती. मोर्चा काढू नये, असे आवाहन केले होते. मात्र, तरीही मोर्चा काढण्यात आला. प्रशासकिय इमारतीसमोर बेकायदा गर्दी, जमवत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, भाषणे झाली. मोर्चा व सभेदरम्यान रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढून सर्वांच्या जिवीताला धोका उत्पन्न करण्याची ही कृती असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case filed against Raju Shetty in Baramati agitation case