
केतकी चितळेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळे हिला चांगलेच महागात पडले. तिच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल झाला. केतकीच्या पोस्टमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली. त्याचबरोबर पवार यांच्याविषयी ट्विटरवरही आक्षेपार्ह मजकुर टाकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दुसरा गुन्हाही सायबर पोलिसांकडे दाखल झाला.
केतकी चितळे हिने संतांच्या अभंगाचा आधार घेत पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर (पोस्ट) लिहीला होता. शनिवारी सकाळपासूनच हि पोस्ट मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाली होती. दरम्यान, पवार यांच्यावर झालेल्या टिकेमुळे पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही समाजमाध्यमांवर केतकीविरुद्ध मोठ्या प्रमाणात टिकेची झोड उठविली होती. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तक्रार अर्ज केला. त्यानुसार, केतकी चितळे हिने पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केले आहे, तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड केली आहे.
तसेच बागलाणकर या ट्विटर हॅंडलवरुन पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तरी दोन्ही ट्विटर हॅंडलवर कारवाई करुन संबंधित व्यक्तींना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. तर ऍड. विकास शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये केतकीने जाणीवपुर्वक दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने व पवार यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट केली. तिच्याकडून वारंवार महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक लिखान व विधान केले जात आहे. दरम्यान, पवार यांच्याविषयी अन्य दोघांनीही आक्षेपार्ह ट्विट केले आहे. त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डि.एस.हाके यांनी दिली.
Web Title: Case Registered Against Ketki Chitale Cyber Police Station Twitter Offensive Post On Ncp Sharad Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..