लैंगिक अत्याचार प्रकरणात माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

case registered against three people including former principal case sexual assault crime news pune

लैंगिक अत्याचार प्रकरणात माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी वानवडी येथील एका शाळेच्या माजी मुख्याध्यापकासह बिशप आणि आर्च बिशपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा राहात असलेल्या घरी चार डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार घडला होता.अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापक आणि या अत्याचाराची तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापकावर कारवार्इ न केल्याप्रकरणी पुण्यातील बिशप आणि मुंबर्इतील आर्च बिशप अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मारुती साहेबराव भापकर (वय ५२, रा. चिंचवड) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भापकर हे सामाजिक कार्यकर्ते असून मुलाच्या आर्इवडिलांनी हा प्रकार त्यांना सांगितला होता.

त्यानंतर त्यांनी याबाबत तक्रारअर्ज केला होता. त्याची दखल घेत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुख्याध्यापक मुलाच्या आर्इ-वडिलांच्या ओळखीचा आहे. घटनेच्या दिवशी तो मुलाच्या घरी आला. त्यावेळी मुलाचे आर्इ-वडील देखील घरी होते. त्यांच्याशी गप्पा मारल्‍यानंतर तो मुलाच्या रुममध्ये गेला व त्याने मुलाशी अश्‍लील चाळे केले. मुख्याध्यापक गेल्यानंतर मुलाने हा प्रकार आर्इ-वडिलांना सांगितला होता. माजी मुख्याध्यापकावर यापूर्वी देखील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा वानवडी पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील ढमरे करीत आहेत.

तुला काय करायचे ते कर

हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी मुलाचे आर्इ-वडील मुख्याध्यापकाकडे गेले होते. त्यावर तो त्यांना म्हणाला की, ‘‘हो मी त्याच्या बरोबर गैरकृत्य केले आहे. त्याबाबत तुला काय करायचे आहे ते कर. मी कोणाला घाबरत नाही.’’ त्यानंतर पालकांनी मुख्याध्यापकाची पुणे आणि मुंबर्इतील बिशपकडे देखील तक्रार केली. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही, असे फिर्यादीत नमूद आहे.