
पुणे : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
पुणे : ओळख असल्याचा बहाणा करून एका इसमाने अल्पवयीन मुलगी (वय ११) शाळेत असताना तिला स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एका शाळेच्या परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणी मंगेश तुकाराम पदमुले (वय ३६, रा. पांडवनगर) याला रात्री उशिरा अटक केली.
याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (पॉस्को) बलात्काराअंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शिवाजीनगर परिसरातील एका शाळेत शिक्षण घेते. नेहमीप्रमाणे ती बुधवारी शाळेत गेली होती. तिने शाळेच्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक अनोळखी व्यक्ती तिला भेटला. त्याने तिच्या कुटुंबाशी ओळख असल्याचा बनाव करून तिच्याशी बोलण्यास सुरवात केली. शाळेतील एका मुलाला मला भेटायचे आहे, असे सांगून तो मुलीसमवेत शाळेच्या मैदानातून आतमध्ये गेला. मुलगी व आरोपी शाळेच्या व्हरांड्यातून चालत असतानाच त्याने मुलीला स्वच्छतागृहात ढकलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर ‘कोणाला काही सांगितल्यास बघून घेईन’ अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला आणि त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकेला सांगितला. त्यांनी मुलीचे पालक व पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, शिवाजीनगर ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोचले. पोलिसांनी शाळेची पाहणी करून शाळेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. तसेच सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांकडूनही माहिती घेऊन पोलिसांकडून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने या प्रकरणातील आरोपी मंगेश पदमुले याला रात्री उशिरा अटक केली. पदमुले हा सुरक्षा रक्षकाचे काम करीत असून, तो पीडित मुलीच्या वडिलांच्या ओळखीचा असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला जनवाडी येथील दारू अड्यावरून अटक केली.
उपसंचालकांमार्फत शाळेची चौकशी
पुणे : ‘‘शाळेत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना निंदनीय आहे. याबाबत उपसंचालकांमार्फत शाळेत तातडीने प्राथमिक चौकशी केली आहे. शाळेमध्ये बाहेरील व्यक्ती आली कशी, याबाबत निश्चितच शाळेला जबाबदार धरण्यात येईल. शिक्षण विभागामार्फत होणाऱ्या चौकशीत शाळा दोषी आढळल्यास शाळेवर कारवाई होईल,’’ अशी माहिती राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ‘सकाळ’ला दिली. तसेच, पुढील काळात अशा घटना घडू नयेत, म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील, असेही मांढरे यांनी स्पष्ट केले.
मांढरे म्हणाले, ‘‘संबंधित शाळेत घटना घडल्याची माहिती मिळताच शिक्षण उपसंचालक औंदुबर उकिरडे यांना शाळेत प्राथमिक तपासासाठी पाठविले. यावेळी सीसीटीव्ही पाहता गुन्हा करणाऱ्या व्यक्तीने शाळेत प्रवेश केल्याचे दिसून आले. या प्रकरणी सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यावर आणि संबंधितांवर शाळेने कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. शाळेकडून ही कारवाई करण्यास दिरंगाई झाल्यास शाळेला तातडीने जाब विचारण्यात येईल.’’
शाळांवर कारवाई करताना मान्यता रद्द करणे, संलग्नता रद्द करणे अशी कठोर पावले उचलणे सयुक्तिक ठरणार नाही. कारण शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसेल. अशा घटनांमध्ये शाळांना निश्चित जबाबदार ठरवून कारवाई करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. तसेच, दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे.
- सूरज मांढरे,राज्य शिक्षण आयुक्त
Web Title: Cases Sexual Crime Against Minor Girl Pune Atrocities
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..