esakal | कागदविरहित कामकाजासाठी 'सीबीएसई'चा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

cbse

शाळेकडून होणारा पत्र व्यवहार, सूचना याचे आदान-प्रदान आता पूर्णपणे कागदविरहित होणार आहे.

कागदविरहित कामकाजासाठी 'सीबीएसई'चा पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे -शाळेकडून होणारा पत्र व्यवहार, सूचना याचे आदान-प्रदान आता पूर्णपणे कागदविरहित होणार आहे. यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई ) पुढाकार घेतला असून 'ई- हरकारा' हे स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारे शाळांना आपल्या सूचना, तक्रारी, निवेदन, सल्ले संबंधित विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना पाठविणे शक्य होणार आहे. 

सीबीएसईने देशातील सर्व शाळांना प्रशासकीय कामकाजासाठी या पोर्टलचा वापर करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. याची कार्यवाही एक सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवसापासून शाळांकडून होणाऱ्या ऑफलाइन किंवा ईमेल पत्रव्यवहाराचे उत्तर दिले जाणार नसल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढील काळात शाळांमधील सर्वप्रकारची कार्यवाही 'ई-हरकारा' पोर्टलद्वारे होणार आहे. अर्जाला मान्यता, परीक्षा आणि अॅकॅडमिक कामकाज  सीबीएसईने यापुर्वीच ऑनलाइन केले आहे. त्यानंतर देखील शाळांकडून निवेदन आणि तक्रारी कागदावर किंवा ई-मेल याद्वारे पाठविल्या जात आहेत. त्यामुळे हे कामकाज संपूर्णपणे कागदविरहित करण्यासाठी मंडळाने हे पाऊल उचलले असून स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

शाळा आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून या पोर्टलचा प्रभावी वापर करू शकणार आहेत. या माध्यमातून शाळांना संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचणे शक्य होणार असल्याची माहिती सीबीएसईच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. त्याशिवाय दरवर्षी निवेदने, तक्रारी पाठविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्ची होणाऱ्या कागदाची आणि वेळेची बचत होणार आहे.

स्वतंत्र पोर्टलमुळे हे होणार शक्य
सीबीएसई आणि त्या संबंधित विभागाला वारंवार पत्र पाठवून, सातत्याने पाठपुरावा करून योग्य ती पावले उचलली जात नाहीत, अशा तक्रारी शाळांकडून सातत्याने केल्या जातात. मात्र यापूर्वी शाळा प्रत्यक्ष कागदावर किंवा ई-मेलचा वापर करून निवेदन पाठवत असे. याद्वारे पाठविलेले निवेदन संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचत नसल्याची शक्यता आहे. परिणामी शाळांची निवेदने धूळखात पडून राहतात. मात्र आता या पोर्टलद्वारे शाळांचे निवेदन थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचू शकणार आहे.

loading image
go to top