esakal | शाळांकडून मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षांची ‘सीबीएसई’ने मागविली माहिती

बोलून बातमी शोधा

Central Board of Secondary Education
शाळांकडून मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षांची ‘सीबीएसई’ने मागविली माहिती
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) राज्यातील किती शाळांमध्ये आतापर्यंत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा झाली आहे, बोर्डाच्या परीक्षेशी संलग्न शाळांचे कामकाज कितपत झाले आहे, याचा आढावा घेण्यासाठी शाळांकडून माहिती मागविली आहे. याबाबत कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही, अशी माहिती ‘सीबीएसई’च्या पुणे विभागाचे रिजनल डायरेक्टर महेश धर्माधिकारी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

‘सीबीएसई’शी संलग्न शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बोलाविले जात आहे. शाळांना बुधवारपर्यत (ता.२८) बोर्डाच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविले जात आहे.’’, असा संदेश गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध समाज माध्यमातून सर्वत्र फिरत आहे. याबाबत शहानिशा करण्यासाठी शहरातील काही सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, अशा प्रकारे सीबीएसईकडून कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.

याबाबत धर्माधिकारी म्हणाले,‘‘आतापर्यंत किती शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘सीबीएसई’ने केवळ माहिती मागविली आहे. त्यात विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे, प्रात्यक्षिक परीक्षा २८ एप्रिलपर्यंतच सक्तीने पूर्ण करावी, असा उल्लेख केलेला नाही. शाळांनी गैरसमज निर्माण केला आहे.’