सीसीटीव्हीचा गुन्हेगारांवर ‘वाॅच’

CCTV-Watch
CCTV-Watch

पुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी शहरातील ‘सीसीटीव्ही’चे जाळे पुणे पोलिसांचे डोळे बनू लागले आहेत. चित्रीकरणाच्या आधारे आरोपींना अटक करण्याच्या वेगात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. तीन वर्षांत सहाशे आरोपींना अटक करणे शक्‍य झाले. २०१७ च्या  तुलनेत २०१८ मध्ये तिप्पट म्हणजेच पाऊण कोटीचा मुद्देमालही जप्त केला आहे.

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुन्हे तत्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यावर पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी भर दिला. २०१५ मध्ये पुण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली. तेव्हापासूनच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ‘सीसीटीव्ही’च्या जाळ्याचा उपयोग केला जात आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पुणे पोलिसांनी दोन वर्षांत पाचशेहून अधिक गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. २०१७ च्या तुलनेत २०१८ या वर्षामध्ये दोनशे जणांना अटक केली. अशाप्रकारे मागील वर्षी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता, २०१८ मध्ये ७४ लाख ९४ हजार म्हणजेच तिप्पट मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरी, जबरी चोरी, दरोडा, वाहनचोरी, वाहनांची जाळपोळ, तोडफोड, खून, खुनाचा प्रयत्न, अपघात, गोळीबार, अपहरण, खंडणी, जमाव जमवून दंगलसदृश स्थिती निर्माण करणे यांसारख्या गुन्ह्यांमधील आरोपींना शोधण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरणाचा मोठा उपयोग होतो.

शहरातील सीसीटीव्हींचे जाळे वाढावे, यासाठी व्यापारी, उद्योजकांची नुकतीच बैठक घेतली होती. त्यामध्ये अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) शिरीष सरदेशपांडे यांनी परिसरामध्ये सीसीटीव्ही बसविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले होते. त्या बैठकीस सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.

प्रमुख चौकांत नजर
शहरातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते, गर्दीची ठिकाणे येथे १३०० सीसीटीव्ही बसविले आहेत. त्याद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. याबरोबरच पुणे पोलिस आयुक्तालया अंतर्गतचे सर्व पोलिस ठाणीही सीसीटीव्हीने जोडली आहेत. सरकारी व खासगी कार्यालये, आयटी व कॉर्पोरेट कंपन्या, औद्योगिक कंपन्यांपासून बाजारपेठा, मोठ्या सोसायट्यापर्यंत सीसीटीव्हीचा वापर होत आहे. विशेषतः गणेशोत्सवामध्ये पुण्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मंडळांनीही सीसीटीव्ही बसविण्यास प्राधान्य दिले.

सीसीटीव्हीचे फायदे 
  किरकोळ व गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पकडण्यास मदत
  वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
  स्वतःबरोबरच शहराची सुरक्षा बळकट करण्यास उपयुक्त
  अनुचित प्रकार, दहशतवादी कृत्यांवर लक्ष ठेवणे

सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी चांगला उपयोग होतो. सोनसाखळी चोरीचा तपास वेगाने करून आरोपींना अटक करणे शक्‍य होत आहे. त्यामुळे गुन्हे रोखण्यासाठी सोसायट्यांपासून दुकानांपर्यंत सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या काळातही सीसीटीव्हीतून पोलिसांचे लक्ष असणार आहे.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com