
Army Recruitment : सैन्यदलाच्या भरती प्रक्रियेमध्ये सीईई असेल पहिली निवड चाचणी
पुणे : भारतीय सैन्यदलाच्या ज्युनिअर कमांडिंग अधिकारी (जेसीओ) आणि इतर श्रेणीच्या (ओआर) भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. त्यानुसार आता भरती प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यात सर्व उमेदवारांना सामाईक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागणार आहे. याबाबतच्या सूचना सैन्यदलाने केल्या आहेत.
नवीन पद्धतीनुसार सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहील. तर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया येत्या १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला सीईई परीक्षा देणे अनिवार्य आहे.
दरम्यान परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल, जेथे त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात निवड झालेल्यांची वैद्यकीय चाचणी होईल.
ऑनलाइन सीईई संपूर्ण भारतात १७६ ठिकाणी आयोजित केले जात आहे. त्यासाठी उमेदवारांना पाच परीक्षा केंद्रे निवडण्याचे पर्याय आहेत. महत्त्वाचे म्हणजेच ऑनलाइन सीईईसाठी उमेदवाराच्या शुल्काचा ५० टक्के वाटा लष्कराकडून उचलला जाणार आहे.
परीक्षेसाठी करता येणार सराव
सैन्यदलाच्या वतीने ऑनलाइन सीईईची तयारी करण्यामध्ये उमेदवारांना मदत करण्यासाठी सर्व विषयांच्या सराव चाचण्या विकसित करण्यात आल्या आहेत. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर एक लिंक देण्यात आली आहे.
यामुळे उमेदवार घरबसल्या या परीक्षेचा सराव करू शकतील. सराव चाचणीमध्ये प्रवेश केल्यावर, उमेदवारांना संगणकावर तीच स्क्रीन पाहता येईल जी त्यांना प्रत्यक्ष परीक्षे दरम्यान दिसेल. या सराव चाचण्या मोबाईलवर देखील देता येतील.
येथे करा नोंदणी व माहितीसाठी संपर्क
उमेदवारांच्या कोणत्याही शंकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी सैन्यदलातर्फे एक मदत कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे. दरम्यान भरती प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी किंवा मदतीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाचा वापर उमेदवारांना करता येईल. तसेच ऑनलाइन सीईई संबंधित प्रश्नांसाठी ७९९६१५७२२२ या क्रमांकावर देखील स्पष्टीकरण उपलब्ध आहे.
सीईई संबंधित बाबी
ही संगणकावर आधारित परीक्षा असेल
ऑनलाइन सीईई परीक्षेसाठी प्रवेशपत्रे परीक्षा सुरू होण्याच्या १० ते १४ दिवस आधी सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल
परीक्षेची सूचना उमेदवारांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे आणि त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल
तसेच प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा अचूक पत्ता असेल
सीईईच्या आधारावर, निवड झालेल्या उमेदवारांना भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल
अंतिम गुणवत्ता ऑनलाइन सीईई निकाल व शारीरिक चाचणीच्या गुणांवर आधारित असेल
भरती प्रक्रियेतील बदलाचे फायदे :
बदललेली कार्यपद्धती भरती दरम्यान अधिक बौद्धिक पैलूंवर लक्ष केंद्रित करेल
यामुळे भरती मेळाव्यामध्ये जमणारी मोठी गर्दी कमी होईल
तेसेच यासाठी जास्त प्रशासकीय व्यवस्था लागणार नाही
ही प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित, उमेदवारांसाठी सोपी होईल
देशाच्या सध्याच्या तांत्रिक प्रगतीशी ही प्रक्रिया सुसंगत असेल
परीक्षा ऑनलाईन असल्याने पेपर फुटीला आळा