शिवजयंतीसाठी शिवभक्त सायकलवरून आला दिल्लीत!

डी. के.वळसे पाटील
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

दररोज सरासरी 161 किमीचा प्रवास करून सोमवारी (ता. 18) संध्याकाळी नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.  

मंचर : शिवभक्त अमोल अभिमन्यू शिंदे यांनी 1450 किमीचा प्रवास सायकलवरून करून नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात झालेल्या शिवजयंती सोहळ्याला हजेरी लावली. त्यांच्या प्रवासाची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेल्या श्रद्धेची दखल घेण्यात आली. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते अमोल शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज, शिवभक्त शरद पोखरकर, अभियंता बाळासाहेब पोखरकर, वैभव पोखरकर उपस्थित होते.

अमोल शिंदे हे मंचरहून सायकलवरून रविवारी (ता. 10) मार्गस्थ झाले होते. त्यांनी दररोज सरासरी 161 किमीचा प्रवास करून सोमवारी (ता. 18) संध्याकाळी नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.  

याबाबत शिंदे म्हणाले, "गेल्या अनेक वर्षांपासून नवी दिल्लीत जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची माझी इच्छा होती. महाराष्ट्रातून छत्रपतींनी घोड्यावरून दिल्लीचे तख्त गाठले होते. माझे अनेक मित्र विमानाने दिल्लीला चल, असे आग्रह करत होते. पण मी सायकलवरून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांनी सुरवातीला विरोध केला. पण मी समजावून सांगितल्यानंतर आई सुषमा शिंदे, वडील अभिमन्यू शिंदे व पत्नी स्वाती यांनी माझ्या निर्णयाला सहमती दिली. प्रवासासाठी नकाशासोबत घेतला होता''.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नामस्मरण करून मोठा पल्ला गाठला. प्रवसात दररोज मला उर्जा मिळत होती. प्रवासादरम्यान पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांची माहिती मिळाली. मन सुन्न झाले. नवी दिल्लीत गेल्यानंतर शिवरायांचा पुतळा व शिवजयंती उत्सव पाहून मी भारावून गेलो. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी माझ्यासोबत मराठीतून संभाषण करून आस्थेवाईकपणे चौकशी केली, असेही शिंदे म्हणाले.       

Web Title: To Celebrate Shivjayanti Shivbhakt came with cycle in Delhi