निमगाव खंडोबा येथे खाटीक समाजाचा भंडारा उत्साहात साजरा

सदाशिव आमराळे
बुधवार, 4 एप्रिल 2018

दावडी (पुणे) : श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा (ता.खेड) येथे मंगळवारी (ता.३) सालाबादप्रमाणे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जुन्नर, खेड, आंबेगाव व अकोले तालुक्यातील हिंदू-खाटीक समाजाच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

दावडी (पुणे) : श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा (ता.खेड) येथे मंगळवारी (ता.३) सालाबादप्रमाणे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जुन्नर, खेड, आंबेगाव व अकोले तालुक्यातील हिंदू-खाटीक समाजाच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यभरातील व राज्याबाहेरील खाटीक समाजाच्या भाविकांनी भंडाऱ्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. निमगाव खंडोबा येथे चैत्र पौर्णिमा झाल्यावर चतुर्थीच्या दिवशी दरवर्षी राज्यभरातील खाटीक समाजाचा भंडारा आयोजित केला जातो. या भंडाऱ्याच्या निमित्ताने आपल्या घरातील मुलामुलींना विवाहासाठी स्थळ दाखविण्याचा कार्यक्रमही केला जातो. तसेच भंडाऱ्याच्या निमित्ताने दूरवरच्या नातलगांच्या भेटीगाठीही होतात. त्यामुळे राज्यभरातील खाटीक समाजातील भाविक आवर्जून या भंडाऱ्यास उपस्थित रहातात.

संध्याकाळी तळीभंडार करून देव्हाऱ्यातील देव देवाच्या भेटीस नेतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी क्षत्रिय मराठा धनगर समाज संघटना नारायणगाव संचलीत हिंदू खाटीक विकास मंडळातर्फे सकाळी खंडेरायास अभिषेक करण्यात आला. राज्यभरातील भाविकांनी 'सदानंदाचा येळकोट' करीत भंडारा व खोबऱ्याची उधळण केली.

भंडाऱ्याच्या उधळणीमुळे मंदिर परिसरास सोन्याची झळाळी आली होती. संध्याकाळी हारतुरे व तळीभंडार झाल्यानंतर समाजातील दानशूर देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. मानाच्या कळसाची मिरवणुक झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री दहा वाजता पालखी व छबिना मिरवणुक काढण्यात आली. भंडाऱ्याचे नियोजन हिंदू खाटीक विकास मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष संतोष घोटणे, सेक्रेटरी हेमंत खांगटे, प्रशांत लाड, काशिनाथ घोडके, दिगंबर कांबळे, अनिल जांभळे, विकास घोणे, दिलीप घोटणे, संजय खंडेलोट, राजेंद्र घोणे, दिपक गाढवे, शिवाजीराव खांगटे यांनी केले. यावेळी राजगुरूनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष परेश खांगटे, महेंद्र घोलप, मुरलीधर खांगटे, जयमल्हार यात्रा मंडळाचे अध्यक्ष बबनराव शिंदे पाटील उपस्थित होते.

Web Title: celebration of khatik community in nimgao khandoba