शर्यतबंदी उठविण्यासाठी केंद्राने संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैल प्राण्यास वगळावे : डॉ. अमोल कोल्हे

डी. के. वळसे पाटील
Thursday, 21 January 2021

पुणे-बैलगाडा शर्यत बंदीमुळे खिलार जातीच्या देशी वंशाच्या बैलांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

मंचर  : पुणे-बैलगाडा शर्यत बंदीमुळे खिलार जातीच्या देशी वंशाच्या बैलांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी नॅशनल अॅनिमल वेलफेअर बोर्डाची बैठक लवकर बोलवावी, अशी मागणी  शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे नवी दिल्ली येथे केली. 

सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण​

मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदीला बैलगाडा मालक संघटना व महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींसाठी वापरला जाणारा बैल हा खिलार जातीचा देशी गोवंश असून त्याचा शेतीकामासाठी त्याचा वापर होत नसल्याकडे केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांचे लक्ष वेधले आहे.

डॉ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात वस्तुस्थिती नमूद करताना, केवळ शर्यतींसाठी वापरण्यात येणारा खिलार बैल सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परिणामी या बैलाची कमी दराने बेकायदा कत्तलीसाठी रवानगी केली जाते. त्यामुळे खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून भविष्यात ही देशी बैलांची जात नष्ट होण्याचा धोका व्यक्त केला आहे. 

पुणे: गाडीला दगड मारला म्हणून त्यानं डोक्‍यातच दगड घातला​

खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचविण्यासाठी बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठणे आवश्यक आहे. त्यासाठी बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने अॅनिमल वेलफेअर बोर्डाची बैठक बोलावून या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: center should remove the bull from the list of protected animals says mp dr. amol kolhe