येरवडा ते शिक्रापूर रस्त्यासाठी केंद्राचा निधी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

नगर रस्ता हा राज्य मार्ग असल्याने राज्य शासनाने पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या सिग्नल फ्री जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने मध्यंतरी घेतला होता.

पुणे - नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापूर दरम्यानचा रस्ता सहा पदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव आता सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी (पीडब्लूडी) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी लागणार निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्यामधील महापालिकेच्या हद्दीतील येरवडा ते खराडी पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. नगर रस्ता हा राज्य मार्ग असल्याने राज्य शासनाने पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या सिग्नल फ्री जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने मध्यंतरी घेतला होता. त्यासाठीचा आराखडा देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी रस्त्यासंदर्भात पीडब्लूडी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीसंदर्भात चर्चा झाली. त्यात पवार यांनी येरवडा ते शिक्रापूर हा रस्ता सहा पदरी करण्याबरोबर कोणत्या ठिकाणी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करायचे यासंबंधीचा आराखडा करावा, अशी सूचना केली. परंतु या कामासाठी ३ हजार कोटींचा खर्च येईल, असा अंदाज पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. त्यावर पवार यांनी या रस्त्यासाठी केंद्राकडूनही निधीची मदत घेता येईल, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला. या रस्त्यासाठी केंद्रानेही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, असे सांगितले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आला आहे. लवकरच तो तयार करून, केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे.

शहरातील सर्वांत जास्त वाहतूक कोंडी नगर रस्त्यावर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सिग्नल फ्री नगर रस्ता करावा, अशी सूचना मी केली होती. त्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यामध्ये हा रस्ता पीडब्लूडीऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करून घेण्याचा निर्णय झाला. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
- सुनील टिंगरे, आमदार

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central funding for Yerawada to Shikrapur road