
Narayan Rane : औद्योगीकरणात मराठी माणूस कुठे आहे; नारायण राणे
पुणे : केंद्र शासनाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी गुजरात, हरियाना आणि उत्तर प्रदेशातून जास्त अर्ज येत आहेत. महाराष्ट्राचे सकल राष्र्टीय उत्पन्न (जीडीपी) जास्त असले तरी ते वाढत राहावे यासाठी उद्योजकांना प्रयत्न करावे लागतील. मुंबई, पुण्यात वेगाने औद्योगिकीकरण वेगात होत असले तरी त्यामध्ये मराठी माणूस कुठे आहे, याचे परीक्षण करावे लागेल, असा प्रश्न केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला.
भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यातर्फे आयोजित पुणे शॉपिंग फेस्टिव्हलचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते झाले. ‘एमएसएमई उद्योजकांसाठी योजना’ या विषयावर राणे यांनी मार्गदर्शन केले. नीलम राणे, माजी नगरसेवक जयंत भावे, प्रज्ञा गोडबोले, सचिन भदाने, वैशाली अपराजित, नम्रता कामतकर, राहुल कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
राणे म्हणाले, ‘नरेंद्र मोदी यायच्या आधी आपली अर्थव्यवस्था जगात १०व्या क्रमांकावर होती. आता ५व्या क्रमांकावर आली असून, मोदी तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यवसाय करणे गैर नाही. मी शिक्षण घेत असल्यापासून व्यवसाय करतो. गोव्यात व इतर ठिकाणी तारांकित हॉटेल आहेत. आपला खिसा भरलेला असताना दुसऱ्याच्या खिशात हात घालायची गरज पडत नाही. केंद्रीय एमएसएमई विभागाकडून देशभरातील उद्योजकांना सर्वतोपरी साह्य केले जात आहे. त्याचा लाभ घेत युवकांनी उद्योजकतेची कास धरावी.