CET सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा; जात, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ

टीम ई सकाळ
Saturday, 16 January 2021

सीईटी सेलतर्फे तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत अभियांत्रिकीसह अन्य पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे

पुणे - सीईटी सेलतर्फे तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत अभियांत्रिकीसह अन्य पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे, पण अनेक विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (इडब्ल्यूएस) प्रमाणपत्र नसल्याने आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना 20 जानेवारी पर्यंत प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. सीईटी सेलने याबाबत परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे.

सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्‍चर, एमटेक, एम आर्च, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. काही अभ्यासक्रमांची पहिली फेरी जाहीर झाली आहे, तर काहींची दुसरी फेरी सुरू झालेली आहे. मराठा आरक्षणास स्थगिती आल्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुला किंवा "इडब्ल्यूएस' प्रवर्गातून अर्ज भरावे लागत आहे. "इडब्ल्यूएस' प्रवर्गातून प्रवेश मिळण्यासाठी प्रमाणपत्राची गरज आहे. तसेच अनेक पालकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र, एनसीएल मूळ प्रमाणपत्र प्रवेश घेताना गरजेचे आहे.

हे वाचा - मुंडे प्रकरणी भाजपचा आंदोलनाचा इशारा ते देशातील लसीकरण मोहिमेच्या अपडेट; वाचा एका क्लिकवर

ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र काढण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती जोडून या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. पण प्रवेश घेताना मूळ प्रमाणपत्र आवश्‍यक आहे, अन्यथा या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागतो. त्याचा आर्थिक भुर्दंडही पालकांना बसतो. त्यामुळे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवावी अशी लेखी व तोंडी तक्रार अनेक पालकांकडून केली जात होती. अखेर त्यास सीईटी सेलने परिपत्रक काढून मुदत वाढविली आहे.

हे वाचा - हीच खरी श्रीमंती! बिल गेट्स बनले जगातले सर्वात मोठे शेतकरी

जात पडताळणी, इडब्ल्यूएस आणि एनसीएल या तीन प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती ऑनलाइन अर्ज करताना सोडलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 20 जानेवारी रोजी सायंकाळी पाच पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक 18 जानेवारी रोजी www.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CET cell give relief to student extend date of submit caste and ews certificate