पुणेकरांच्या दुपारी झोपण्याच्या सवयीवरुन चंद्रकांत पाटलांचा टोला; दिले मोदींचे उदाहरण

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 25 October 2020

कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांच्या दुपारी 1 ते 4 झोपण्याच्या सवयीवरुन टोला लगावला आहे

पुणे- कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांच्या दुपारी 1 ते 4 झोपण्याच्या सवयीवरुन टोला लगावला आहे. पुण्यातील लोकांना 1 ते 4 झोपण्याची सवय आहे. या काळात ते काही काम करत नाहीत. पण, मोदींकडे पहा ते 22 तास काम करतात, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी पुणेकरांना उपदेश दिला आहे. ते पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपा आमदार-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

पुण्यातील लोकांच्या स्वभावावरुन अनेकदा त्यांच्यावर विनोद केले जातात. जगभरात त्यांची 1 ते 4 झोपण्याची सवय परिचित आहे. पण चंद्रकांत पाटलांनी पुणेकरांच्या याच सवयीवरुन टोला लगावला आहे. काम करण्यासाठी निवडून यायचं असतं, नाहीतर 5-6वेळा आमदार होऊन काहीही फायदा नाही. लोकांनी आपल्याला निवडून दिलय ते काम करण्यासाठीच. आपलं टार्गेट आपण ठरवायचं असतं. पंतप्रधान मोदींकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. मोदींनी कधीही टीकेची काळजी केली नाही. त्यांच्यावर कितीही टीका झाली, तरी ते सरळ चालत राहतात, असं पाटील म्हणाले आहेत.

व्हॉट्सऍप वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे; कंपनीने दिली माहिती

नरेंद्र मोदी २४ तासात २२ तास काम करतात. त्यांनी आपलं लक्ष्य ठरवलं आहे. योगींकडे अशी एक स्थिती असते की ते न झोपता राहु शकता. दोन तास तरी का झोपायचं? त्या दिशेने मोदींचा प्रयत्न सुरु आहे.  काही जण दुपारी झोपतात. पुणे परिसरात असे जास्त लोक आहेत. ते म्हणतात दुपारी 1 ते 4 काहीही काम सांगू नका. मोदींकडे बघा ते फक्त 2 तास झोप घेतात आणि 22 तास काम करतात, असं म्हणत पाटलांनी पुणेकरांना टोला लगावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil advice to punekar gave pm modi advice