चंद्रकांत पाटलांनी निवडणुकीवर केला 'इतका' खर्च

अनिल सावळे
Tuesday, 29 October 2019

- कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढवली होती निवडणूक

- निवडणुकीचा संपूर्ण खर्च आला समोर.

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांची निवडणुकीतील खर्चाची रक्‍कम ऐकून विश्‍वास बसणार नाही. दैनंदिन हिशेबाच्या नोंदीनुसार त्यांनी खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार एकूण सहा लाख 57 हजार 289 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. परंतु कोथरूडमधील ही निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली. निवडणुकीत उमेदवाराच्या निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशेबांच्या नोंदी केल्या जातात. या नोंदवहीतील खर्च निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीकडे सादर केला जातो. पाटील यांचे निवडणूक प्रतिनिधींनी हा तपशील आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार 13 ऑक्‍टोबरला शिवाजी पुतळा ते आशिष गार्डनपर्यंत काढण्यात आलेल्या रॅली आणि जाहीर सभेवर एक लाख आठ हजार 154 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.

'युती'त रंगला सत्तेचा सामना; शिवसेना समान वाटपावर ठाम!

रॅलीसाठी हलगी, ध्वनिक्षेपक, रिक्षा, प्रचारासाठी वाहन, उमेदवाराच्या वाहनाचा इंधन खर्च आणि छायाचित्रणावरील खर्च झाला आहे. तसेच, जाहीर सभेच्या स्टेजसाठी 48 हजार रुपये, खुर्च्यांवर 16 हजार रुपये, एलईडी स्क्रीन आणि साऊंड सिस्टीमवर 18 हजार रुपये खर्च झाले आहेत. टी-शर्टवर 23 हजार रुपये तर सोशल मीडियासाठी 19 हजार 589 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

दिल्लीतील महिलांना केजरीवालांची ओवाळणी; मोफत प्रवास योजना सुरू

या मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे होते. त्यांनी निवडणुकीत नऊ लाख 27 हजार 727 रुपये खर्च झाल्याचे दाखवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil expenses 6 lakhs 57 thousand for Election