चंद्रकांत पाटील म्हणतात, अटलजींमुळे ‘हिंदू’चा अर्थ समजला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

काश्‍मिरी मुलींसाठी निधी उभारणार
काश्‍मीरच्या बाधित भागातील शंभर मुलींना शिक्षणासाठी पुण्यात आणण्याचा सरहदचा मानस आहे. या मुलींचा काही वर्षांचा खर्च भागेल एवढा निधी मी लोकसहभागातून उभा करून देईल. काश्‍मिरी मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा माझा प्रयत्न असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुणे - हिंदू ही जीवनसंस्कृती आहे. आपुलकी, प्रेम, सलोखा हे गुण ज्यांच्यात आहेत, तो हिंदू. पण अनेकांना या शब्दांवर आक्षेप का आहे हे समजत नाही. मला हिंदू या शब्दाचा खरा अर्थ अटलजींच्या सहवासात समजला. काश्‍मीरप्रश्‍नीदेखील त्यांच्या विचारानेच पुढे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरहद संस्थेमध्ये अटलबिहारी वाजपेयी ग्रंथालय आणि काश्‍मीर महोत्सवाचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनायक पाटणकर, भाजपचे प्रदेश सचिव राजेश पांडे, संस्थेचे संजय नहार, शैलेश वाडेकर, शैलेश पगारिया आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ‘आमचे सरकार गेले; पण, ताकद खूप मोठी आहे. त्यामुळे देशातील संकटाशी सामना करण्याचा यज्ञ सुरू आहे. त्यात माझा सहभाग अग्रणी राहील. अटलजींमुळे हिंदू या शब्दाचा अर्थ उमगला. त्यांच्या नावाने सुरू झालेले हे ग्रंथालय आणखी मोठे झाले पाहिजे. 

भाजप मंत्री म्हणतात, राहुल-प्रियांका तर लाईव्ह पेट्रोल बॉम्ब

पाटणकर म्हणाले, ‘प्रत्येक समाजाची शक्ती ही त्यांच्या सांस्कृतिक वारशात असते. काश्‍मीरमध्ये काश्‍मिरियत ही संस्कृती आहे. ती जिवंत असेपर्यंत या राज्याला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तरुणांनी हा वारसा जपून ठेवल्यामुळे राज्याचे भविष्य सुरक्षित आहे.’

नहार म्हणाले, ‘काश्‍मिरींच्या पुनर्वसनाबरोबरच धोरणांवरही काम करावे लागेल, असा विचार करून आम्ही हे मिशनरी काम सुरू केले. संगीतापासून साहित्यापर्यंत ज्यातून देश जोडता येईल, ते काम आम्ही करीत आहोत. काश्‍मीर महोत्सवही त्याचाच एक भाग आहे.’ मजहर सिद्दीकी यांनी गणेश वंदना सादर केली. समारोप शमिमी अख्तर यांनी गायलेल्या पसायदानाने झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil says Atlaji understood the meaning of Hindu