Chandrasekhar Bawankule : बारामतीचा विकास म्हणजे मतदारसंघाचा विकास नाही; चंद्रशेखर बावनकुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrasekhar Bawankule statement Baramati development is not constituency development politics

Chandrasekhar Bawankule : बारामतीचा विकास म्हणजे मतदारसंघाचा विकास नाही; चंद्रशेखर बावनकुळे

दौंड : एकट्या बारामती शहराचा विकास केला म्हणजे पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास होत नाही. ५० वर्षे सत्तेत असतानाही बारामती तालुक्यातील ४० गावांसह दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी नाही आणि एकूण मतदारसंघात पाणीटंचाई आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

दौंड कृषी महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले व त्या वेळी ते बोलत होते. भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, आदी या वेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ` आम्ही विकास केला ,असे सतत ओरडणार्यांनी जनतेवर उपकार केलेले नाही.

काही लोक केंद्राची मदत घेतात, सीएसआरचा निधी घेतात मात्र हे आम्हीच केलं असं सांगतात. विकासाचा भ्रम पसरविण्यात आला. १५ वर्षे पदावर असणार्यांनी सत्तेत असताना आराम केला आणि सत्ता गेल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्वीटरद्वारे पुलासंबंधी मागण्या करीत आहेत.`

ते पुढे म्हणाले, ` अमेठी (उत्तर प्रदेश ) मध्ये परिवर्तन झाले आणि मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. सत्तेचे प्रतिबिंब समाजाच्या शेवटच्या व्यक्तीवर उमटले पाहिजे, या भावनेतून आम्ही काम करीत आहोत. टंचाई दूर करण्यासह विकासकामांसाठी प्रयत्न करणार आहोत.

आम्ही शेतकर्यांना शुल्क आकारत नाही...

काही मोठ्या लोकांच्या जवळ गेल्यावर ते किती गरीब आहेत, हे आपल्याला कळते. गरिबीमुळे काही मंडळींना कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शुल्क आकारावे लागत आहे. मात्र दौंड मध्ये शुल्क आकारणी नाही. प्रदर्शन आयोजनामागे शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा आणि स्वयंपूर्ण करण्याचा हेतू असावा, अशी आशा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.