आळंदीतील वारकर्‍यांची बदलली जीवनशैली; मंदिराऐवजी धरला कंपनीचा रस्ता!

Warkari
Warkari

आळंदी - गाव पातळीवरिल हरिनाम सप्ताह, प्रवचन किर्तन, अभंगवाणी कार्यक्रमातून मानधन मिळत. यातून कुणी शिक्षणाचा तर कुणी कुटूंबाच्या गरजा भागवित. कोरोना आला, किर्तन प्रवचनाचे कार्यक्रम नसल्याने आम्हाला पैसे येण्याचे मार्ग पूर्णच बंद झाले. परिणामी माझ्यासह अनेकांनी चाकण औद्योगिक भागात रोजंदारीवर काम करण्याचा मार्ग पत्करला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाने आमची जिवनशैली बदलण्यास भाग पाडले.परंतु वेळिच कळाल्याने भविष्यातील धोका टळला. परमार्थ म्हणजे कुटूंब चालविण्याचे साधन हे गेली काही वर्षे आमच्या जिवनाचा भाग झाला होता. मात्र परमार्थ जिवनातील निव्वळ आनंदासाठी आहे असे मानून आता कुटूंबाच्या आर्थीक गरजेसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यास माझ्यासारख्या अनेकांनी सुरूवात केली. आणि कंपनीत काम करण्याचा  मार्ग धरला. ही भावना बोलून दाखवली आळंदीतील सतिश महाराज भिताडे यांनी.

कोरोनामुळे दिर्घकाळ लॉकडाऊन झाला. किर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताहासारखे वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम पूर्णपणे बंद आहेत. परिणामी मराठवाडा,खानदेश,दक्षिण महाराष्ट्रातून आळंदीत स्थायिक वारक-यांनी कोणताही मोठेपणा न बाळगता संत सावता महाराजांच्या अभंगाप्रमाणे समयासी सादर व्हावे,देवे ठेविला तैसे रहावे सादर असे म्हणत आता चाकण, भोसरी औद्योगिक भागात कंपनीत रोजंदारीचा मार्ग पत्करला. भोसरी, चाकण औद्योगिक भागात सहाशेहून अधिक वारकरी विद्यार्थी, महाराज रोजंदारीवर काम करत असल्याचे चित्र आहे. तर काहींनी वडापाव, कॅबचालक, भाजीचा धंदा करण्यास सुरूवात केली.

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला. परिणामी संचारबंदीमुळे मार्च, एप्रिल आणि मे मधील रामनवमी,हनुमान जयंती, गुडीपाडवा सारख्या महत्वाच्या सणांना तसेच संताच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे धार्मिक कार्यक्रम पूर्ण बंद झाले. या काळात वारक-यांना विविध ठिकाणी मोठी मागणी असते. किर्तन प्रवचनासाठी पाच हजार रूपयांपासून पन्नास हजार रूपयांपर्यंतचे बंद पाकिटातून मानधन मिळे.

किर्तनाच्या मागे उभे राहणारे वारकरी, पखवाज वाजविणारे यांनाही बिदागी मिळायची. जेवढा मोठा महाराज तेवढे मानधन मोठे. पण कोरोनामुळे हे मानधन मिळणे बंद झाले. बरं गाव पातळीवर व्यक्तीच्या मरणानंतर दशक्रिया विधीला प्रवचन ठेवले जाईल. यामधूनही चांगले उत्पन्न महाराज मंडळींना होते. गेल्या वीस वर्षात आळंदीत येवून स्थायिक झालेल्या महाराज मंडळींचीही संख्या मोठी होती. तसेच अनेकांनी आळंदीत धर्मशाळा भाड्याने घेवून तसेच स्वताच्या घरात वारकरी विद्यार्थी ठेवले होते. कुणाकडे चाळिस, कुणाकडे दोनशे विद्यार्थी होते. मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्व विद्यार्थी आपापल्या गावी घेवून गेले. परिणामी आळंदीतील सुमारे सहा हजारहून अधिक वारकरी विद्यार्थी गावी गेल्याने आळंदीतील शाळाही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गावी गेलेले वारकरी विद्यार्थी पून्हा माघारी आले नाही तर वारकरी शिक्षण देणा-या संस्थाही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. साठीच्या पुढील महाराज मंडळीचे उत्पन्नच नसल्याने त्यांनाही चिंता सतावत आहे. 

परंपरागत आषाढी वारीवरही बंधने आली. वारी न घडल्याने अनेक फडकरी दिंडीक-यांची वारी चुकली.तर वारीत दिंडी चालविण्याच्या माध्यमातून भिशीच्या पैशातून मोठी आर्थिक उलाढाल होत. तीही यंदा पूर्ण बंद पडली.त्यानंतर श्रावण महिना,चातर्मासाला आळंदी पंढरपूरला धार्मिक कार्यक्रम होतात. यावरही पूर्ण बंधने असल्याने इश्वराच्या दर्शनावाचून महाराज मंडळीची अवस्था बैचेन झाली. तर काहींचा उत्पन्नाचा श्रोतच बंद पडल्याने खायचे काय अशी अवस्था झाली. आळंदीतील काही स्थायिक मंडळी पुन्हा गावाकडे जावून शेती करू लागली. मात्र गेली पंधरा विस वर्षात शेतीची सवय नसल्याने आहे समाजात रूबाबात राहयची सवय असल्याने ती कामेही करणे अवघड झाले. मग अनेकांनी पुन्हा आळंदीचा रस्ता धरला आणि थेट चाकण औद्योगिक भागात काम करण्यास सुरूवात झाली.

गायक,पखवाज वादन आणि पेटी वाजविणा-या अनेक कलाकारांना सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन नसल्याने त्यांचेही उत्पन्नाचे मार्ग बंद झाले. कर्ज काढून काहींनी घरे बांधली. गाड्या घेतल्या. आता हप्ते कसे फेडायचे या विवंचनेत वारकरी आहेत.

सतिश महाराज भिताडे म्हणतात आता माझ्यासारखे अनेक वारकरी विद्यार्थी, महाराज मंडळी चाकण भोसरीत कामाला जात आहे. तिनशे रूपयांपासून रोज मिळत आहे. मी जेथे काम करतो तिथे किमान दोनशेहून अधिक विद्यार्थी काम करत आहेत. किमान स्वताचा खर्च तरी भागत असल्याचे समाधान सध्या आहे.माझ्या शिक्षणासाठीच्या खर्चाची परवड बंद झाली. मात्र दिर्घकाळ आळंदीत राहायचे असेल तर उत्पन्नासाठी दिशा बदलावी लागेल. 

लॉकडाऊन काळात वारक-यांच्या मदतीसाठी काही संघटनाही धावल्या. वारकरी विद्यार्थी तसेच कुटूंबियांना शिधा वाटप केले. यामुळे जेवणाची व्यवस्था झाली. मात्र आर्थिक श्रोत कसा उभारायचा या विवंचनेत सध्या वारकरी आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर पुन्हा सुरळित कसे होईल या आशेवर सध्या वारकरी संप्रदाय आहे. तर काही वारक-यांनी मात्र सुरूवातीपासून किर्तन प्रवचन, गायकी हा उदर निर्वाहाचा माध्यम म्हणून न बाळगल्याने त्यांना चिंता नाही.

याबाबत आळंदीतील स्थानिक वारकरी महंत पुरूषोत्तम महाराज पाटील यांनी सांगितले, पोट भरण्याचे साधन पर्मार्थ नाही. केवळ पारमार्थिक आनंदासाठी करायचा. ईश्वराची भक्ती, चिंतन आणि प्रबोधनासाठी परमार्थ हे आता कोरोनाने शिकविले.परिणामी वारक-यांनी जिवनशैली बदलली.परमार्थ चालू ठेवून अनेकांनी उदरनिर्वाहाचे साधन बदलले. अनेकजणांना मीही माझ्या ओळखीने औद्योगिक भागात कामाला लावले. पुढील काळात अडचणी येवू नयेत यासाठी परमार्थाबरोबर रोजगार मिळवून कुटूबांच्या गरजा कशी भागवायच्या. उदरनिर्वाहाचे विविध पर्याय आणि दिशा देण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रातील तज्ञांना आणून वारक-यांची कार्यशाळा लवकरच आयोजित करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com