कर्ज मंजूर करतो म्हणाला अन् पावणे चार लाख रुपये लुटून गेला!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

देवर याच्याकडे बॅंकिंग व्यवसायासाठी आवश्‍यक कोणताही परवाना नसताना तसेच तो कोणत्याही बॅंकेचा अधिकृत प्रतिनिधी किंवा अधिकारी नसतानाही त्याने वित्तपुरवठा कार्यालय सुरू केले होते. 

पुणे : मोठमोठ्या व्यापार संकुलांमध्ये मोठमोठी कार्यालये थाटून नागरीकांना कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करीत एकाने 29 नागरीकांची तब्बल पावणे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अॅड. सदावर्ते यांच्या पुतळ्याला चपलांचा हार; छावा संघटनेचं पुण्यात आंदोलन​

विश्‍वराज जयदेव देवर (रा.कडनगर, उंड्री) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजू थोरात (वय 51, रा.भीमनगर, कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवर याची वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुपर मॉलच्यावर तसेच सिक्रेट हार्ट टाऊन मॅडोनाल्डच्यावरील दुसऱ्या आणि सहाव्या मजल्यावर 'देवर फायनान्स' या नावाने कार्यालये थाटली आहेत. देवर याच्याकडे बॅंकिंग व्यवसायासाठी आवश्‍यक कोणताही परवाना नसताना तसेच तो कोणत्याही बॅंकेचा अधिकृत प्रतिनिधी किंवा अधिकारी नसतानाही त्याने वित्तपुरवठा कार्यालय सुरू केले होते. 

मारटकर खून प्रकरण : हत्यारे पुरविणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; मारेकऱ्यांना दिले होते कोयते​

दरम्यान, फिर्यादी यांच्या पत्नीला दोन लाख रुपयांच्या कर्जाची आवश्‍यकता होती. त्यासाठी त्यांच्या पत्नीने देवर याच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी फिर्यादी यांना दोन लाख रुपये कर्ज मंजूर करुन देतो, असे त्याने सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या पत्नीसमवेत त्यांचे नातेवाईक व अन्य नागरीक अशा 29 लोकांकडून त्याने कर्ज मंजूर करण्यासाठी प्रत्येकी 13 हजार रुपये, असे एकूण तीन लाख 77 हजार रुपयांची रक्कम घेतली. त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचे कर्ज मंजूर करुन दिले नाही. फसवणूक झाल्यानंतर फिर्यादीने त्याच्याकडे पैसे परत देण्याची वारंवार मागणी केली. मात्र, त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फिर्यादींनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under pretext of loan sanction one person robbed of Rs 4 lakh from 29 citizens