हिंजवडीत महावितरणतर्फे चार्जिंग स्टेशन

हिंजवडी : फेज-टू मधील वीज उपकेंद्राच्या आवारात मोटारींसाठी उभारलेले चार्जिंग स्टेशन.
हिंजवडी : फेज-टू मधील वीज उपकेंद्राच्या आवारात मोटारींसाठी उभारलेले चार्जिंग स्टेशन.

पिंपरी - इलेक्‍ट्रिक मोटारींच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून राज्य विद्युत महावितरण कंपनीही पुढे सरसावली आहे. कंपनीच्या वतीने शहरात प्रथमच हिंजवडी औद्योगिक वसाहतीतील फेज-टू मधील वीज उपकेंद्रात अशा प्रकारचे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. या महिनाअखेरीस ते कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

वाढते प्रदूषण, पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या आयातीसाठी मोजाव्या लागणाऱ्या परकीय चलनाची बचत व्हावी अशा कारणांमुळे सरकारने इलेक्‍ट्रिक मोटारी, दुचाकींच्या वापराला प्राधान्य दिले आहे. मात्र, त्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाहीत. अशा मोटारींच्या मागणीत वाढ न होण्यामागे किमती जास्त असण्यासह चार्जिंग स्टेशनच्या पुरेशा सोयींचा अभाव हेसुद्धा कारण आहे, त्यासाठी महावितरणने पुढाकार घेतल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या पुण्यातील बाणेर, वडगाव शेरी अशा चार-पाच ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. कंपनीच्या वतीने आणखी १० ते १२ चार्जिंग स्टेशन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये खासगी मोटारींसाठी कंपनीचे आतापर्यंत एकही असे स्टेशन नव्हते. हिंजवडी येथील स्टेशनसाठी सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. फेज-टूमधील एम्क्‍युअर फार्मास्युटिकल कंपनीजवळील महावितरणच्या उपकेंद्राच्या आवारात हे स्टेशन उभारण्यात आले आहे.
नागरिकांकडून इलेक्‍ट्रिक वाहनखरेदीला प्राधान्य मिळावे, यासाठी केवळ पाच ते सहा रुपये प्रतियुनिट याप्रमाणे संबंधित मोटारमालकाकडून कंपनी शुल्क घेणार आहे. या स्टेशनसाठी लघुदाब मीटर वापरण्यात आला आहे. या चार्जिंग स्टेशनच्या चार्जिंगचे टेस्टिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे या महिनाअखेरीस ते प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे.

महावितरणने उभारलेले चार्जिंग स्टेशन एकदम कोपऱ्यात आहे. या परिसरातील आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली असता कोणालाही असे स्टेशन उभारण्यात आल्याचे माहिती नव्हते. तसेच, या स्टेशनच्या आवारात खूप अस्वच्छता असून झाडेझुडपेही वाढलेली आहेत. रात्री येथे एखाद्या महिलेला तिची मोटार चार्जिंग करावयाची झाल्यास तेथे रहदारी नसल्याने सुरक्षेचा प्रश्‍न उद्‌भवू शकतो. तसेच, हे केंद्र दूरवर असल्याने त्याला ग्राहकांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com