फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट...अश्लील व्हिडिओ कॉल अन् पैशांची मागणी...

निलेश बोरुडे
Monday, 30 November 2020

फेसबुकवर सुंदर प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आकर्षणापोटी तरुणांकडून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली जाते. ऑनलाइन चॅटिंग सुरू होते. बोलणे वाढल्यानंतर व्हिडिओ कॉल होतो आणि तरुण अलगद 'हनी ट्रॅप' मध्ये फसला जातो.

किरकटवाडी: फेसबुकवर सुंदर प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आकर्षणापोटी तरुणांकडून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली जाते. ऑनलाइन चॅटिंग सुरू होते. बोलणे वाढल्यानंतर व्हिडिओ कॉल होतो आणि तरुण अलगद 'हनी ट्रॅप' मध्ये फसला जातो. अशाप्रकारे व्हिडिओ कॉलवर झालेले अश्लील संभाषण नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत किरकटवाडी व खडकवासला परिसरातील अनेक तरुणांकडून पैशांची मागणी केली जात  असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत काही तरुणांनी सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार केली आहे तर बदनामीच्या भीतीने काही तरुण तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अश्लील संभाषण फेसबुक मेसेंजर च्या माध्यमातून फ्रेंड लिस्ट मधील नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची भीती दाखवत दहा हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत पैशांची मागणी अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या तरुणींकडून केली जात आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ कॉल वर अश्लील संभाषण जरी झालेले नसले तरी एडिट करून सदर संभाषणाला अश्लील भाग जोडला जात आहे. शारीरिक आकर्षणातून किंवा सौंदर्याला भूलून तरुणांनी केलेल्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागत आहे. बदनामीच्या भीतीने तरुण तडजोड करून पैसे द्यायला तयार होताना दिसत आहेत.

फेसबुक अकाउंट क्लोन करण्याचे प्रकारही वाढले...मागील काही दिवसांमध्ये फेसबुक प्रोफाईलवरील माहिती चोरून दुसऱ्यांच्या नावाने बनावट अकाउंट सुरू करण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बनावट अकाऊंट सुरू करून मूळ व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमधील इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करण्यात आल्यानंतर फेसबुक मेसेंजर वरून भावनिक मेसेज करून पैशांची मागणी करण्यात येते. त्यामुळे फेसबुक वरील खाजगी माहिती चोरीला जाऊ नये म्हणून फेसबुक अकाउंट लॉक करून ठेवावे तसेच अशाप्रकारे पैशांची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष फोनद्वारे चर्चा करावी असे आवाहन सायबर क्राईम पोलिसांनी केले आहे.

पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, धानोरी भागात मिळणार पुरेसे पाणी कारण..

तरूणांबरोबरच इतर वयोगटातील पुरुषांचीही फसवणूक...याबाबत सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधला असता तरुणांबरोबरच इतर वयोगटातील पुरुषही अशा प्रकारच्या फसवणूकीला मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याची माहिती मिळत आहे. अशाप्रकारे ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली जात असल्याबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत असल्याची माहिती पुणे ग्रामीण सायबर क्राईम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अर्जुन मोहिते यांच्याकडून देण्यात आली.

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर दुधाचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नये. फेसबुक वर आलेल्या अश्लील लिंक ओपन करू नयेत. अश्लील फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नयेत. सर्वांनीच भान ठेवून समाज माध्यमांचा वापर करावा. आर्थिक नुकसान व बदनामी करून घेण्यापेक्षा अँड्रॉइड मोबाईल वापरताना व त्यातील फेसबूक, व्हाट्स ॲप अशा समाज माध्यमांचा वापर करताना सर्वांनीच खबरदारी घ्यावी. अशाप्रकारे फसवणूक झाल्यास किंवा फसवणूक होण्याचा संशय आल्यास तात्काळ सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधावा. -राजकुमार वाघचौरे, पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम पोलीस ठाणे, पुणे शहर.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating young people on Facebook