झोपेची गुणवत्ताही आता तपासा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - रात्री झोपल्यानंतर तुमची झोप कशी झाली, याची क्षणार्धात माहिती देणारे तंत्रज्ञान पुण्यात विकसित झाले आहे. झोप किती वेळ लागली, तिची गुणवत्ता कशी होती, झोपेत श्‍वास थांबला का, किती वेळा थांबला या सर्वांचे विश्‍लेषण करून ही माहिती तुम्हाला सचित्र मिळेल, अशी व्यवस्था यात आहे. 

पुणे - रात्री झोपल्यानंतर तुमची झोप कशी झाली, याची क्षणार्धात माहिती देणारे तंत्रज्ञान पुण्यात विकसित झाले आहे. झोप किती वेळ लागली, तिची गुणवत्ता कशी होती, झोपेत श्‍वास थांबला का, किती वेळा थांबला या सर्वांचे विश्‍लेषण करून ही माहिती तुम्हाला सचित्र मिळेल, अशी व्यवस्था यात आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

दिवसा येणारा थकवा, चिडचिड किंवा उदासीनतेमागे पुरेशी झोप न मिळणे हे प्रमुख कारण असते, त्यामुळे आपल्या झोपेची गुणवत्ता नेमकी कशी आहे, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. झोपेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘स्लीप लॅब’ आहेत. परंतु, त्यात हाताला, पायाला, डोक्‍याला वेगवेगळ्या वायर लावल्या जातात. इतके जखडल्यानंतर त्या रुग्णाला झोप कशी येईल, असाही प्रश्‍न पडतो. त्याला पर्याय म्हणून अंथरुणाच्या खाली सेंसर लावलेला पट्टा टाकून झोपेची गुणवत्ता तपासण्याचे तंत्र राम पाझ्यायन्नुर यांनी विकसित केले आहे. ‘स्नूझफिट’ असे याचे नाव आहे. 

याबद्दल माहिती देताना पाझ्यायन्नुर म्हणाले, ‘‘झोपेची गुणवत्ता मोजण्यासाठी नैसर्गिक झोप लागली पाहिजे. त्यासाठी आपल्या शरीरावर कोणतेही उपकरण चिकटविण्याची गरज नसावी. यातून हे ‘स्नूझफिट’ विकसित झाले आहे. एक पट्टा तयार करून त्यावर सेंसर लावले आहेत. हा पट्टा झोपताना फक्त अंथरुणाखाली टाकायचा आणि वायफाय सुरू करायचे. रात्रभरात आपली झोप कशी झाली, याची सविस्तर माहिती मिळते. झोपेत हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण, श्‍वास थांबण्याच्या वेळा आणि त्यांचा कालावधी अशा निकषांवर विश्‍लेषण करून यातून झोपेच्या गुणवत्तेची माहिती सकाळी मिळते.’’

अपुऱ्या झोपेमुळे काय होते?
निद्रानाश, मधुमेह, लठ्ठपणा, ‘ऑबस्ट्रक्‍टिव्ह स्लीप एपनिया’, ‘रेस्टलेस लेग सिंड्रोम’

भारती हॉस्पिटलमध्ये ‘स्नूझफिट’ची काही रुग्णांवर चाचणी करण्यात आली आहे. त्यातून रुग्णांच्या झोपेची गुणवत्ता कळाली. तसेच, रुग्णांच्या मानसशास्त्रीय स्थितीचे विश्‍लेषण करता आले. 
- डॉ. ज्योती शेट्टी, प्रमुख, मानसोपचार विभाग, भारती विद्यापीठ 

काय आहे ‘स्नूझफिट’? 
 अंथरुणाखाली टाकायचा सेन्सर लावलेला पट्टा 
 वायफाय सुरू केल्यानंतर कार्य सुरू 
 हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्‍सिजनचे मोजमाप 
 सर्व घटकांचा विचार करून झोपेचे विश्‍लेषण

Web Title: Check the quality of sleep