राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat singh koshyari and prahlad singh patel

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Pune News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र नाराजी

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कोश्‍यारी यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्याविषयी महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झालेल्या भावना या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पक्षश्रेष्टीला कळविण्यात येतील. यानुसार दिल्लीत परतल्याबरोबर याबाबतची सविस्तर माहिती पक्षश्रेष्टीला दिली जाणार असल्याचे संकेत केंद्रीय जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया व उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी गुरुवारी (ता.२४) पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांनी गुरुवारी पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी गुरुवारी दुपारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार योगेश टिळेकर, ॲड. धर्मेंद्र खांडरे आदी उपस्थित होते. पटेल यांनी यावेळी कोश्यारी यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, 'राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे या पदाला फार महत्त्व आहे. अशा महत्त्वाच्या पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा नेत्याने महापुरुषांचा अवमान होईल, असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांच्या या चुकीचे कोणीही समर्थन करणार नाही. त्यामुळे आपण या विषयावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलणार नाही. परंतु याबाबतच्या लोकभावना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे नक्कीच पोचवू.’

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मतदारसंघात काहीच विकासकामे केली नसल्याचे या मतदारसंघात फिरल्यानंतर निदर्शनास आले आहे. कोल्हे हे केवळ पूर्वीच्या खासदाराने केलेल्या कामाच्या श्रेय घेत आहेत. ते निष्क्रिय खासदार आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होईल. त्यासाठी पक्ष संघटना पातळीवर काही ठिकाणी काम करण्याची गरज आहे. मात्र कोल्हे यांनी भाजपत प्रवेश केल्यास, त्यांचे स्वागत केले जाईल, असेही पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत त्यांनी मत व्यक्त करण्यास नकार दिला.

खासदार राहुल गांधींवर टीका

कॉंग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. याबाबत प्रश्‍न विचारला असता, त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. या पदयात्रेच्या माध्यमातून व्यक्तीविरोधी विचार पेरून समाज तोडण्याचे काम केले जात आहे. याचे मूल्यांकन करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आपले काम चोखपणे करत आहे. जनतेशी संवाद साधत आहे. त्यामुळे अशा पदयात्रांमुळे लोकसभा निवडणुकीवर काहीही नकारात्मक परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘बटाटा पिकाला विम्‍याचे संरक्षण देऊ’

शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कांदा आणि बटाटा पिकाचे अधिक उत्पादन घेत आहेत. या भागात फिरत असताना शेतकऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर कांद्याची साठवण ही प्रमुख समस्या असल्याचे दिसून आले आहे. सध्या देशात चार ठिकाणी कांदा प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून कांदा काढणीपासून पुढे किमान वर्षभर कसा टिकेल, याकडे केंद्र सरकार लक्ष देत आहे. यासाठी या भागात कांद्याचा साठवण कालावधी व क्षमता वाढविण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरता येईल, हे तपासले जाईल. याशिवाय खेड तालुक्यात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, त्याला विम्याचे संरक्षण नाही. याचा विचार करून विशेष बाब म्हणून या पिकाचा विमा योजनेत समावेश करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.