ससूनच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यास विद्यार्थ्यांची धक्काबुक्की; अॅडमीट तरुणीला गेले होते भेटायला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

चप्पल आणि बूट घालून आतमध्ये जाऊ नका, तसेच रुग्णाजवळ एकाच व्यक्तीस थांबण्यास परवानगी आहे, असे सांगितले. त्यावेळी तिघांनी सुरक्षारक्षकास शिवीगाळ करीत मारहाण केली.

पुणे : रुग्णाला भेटण्यासाठी चप्पल आणि बूट घालून जाऊ नये, असे सांगणाऱ्या सुरक्षारक्षकाला रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केली. एवढे करून ते थांबले नाहीत. तर त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ससून रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासही तरुणांनी धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तिघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. मारहाण करणारे तिघेहीजण विद्यार्थी आहेत. 

देहूतील संत तुकोबांचा देऊळवाडा दर्शनासाठी बंद​

रोहन पवार (वय 23), योगेश वाघमारे (वय 22), सूरज वाघमारे (वय 20, सर्व रा. खड्डा झोपडपट्टी, ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शंकरलाल चौधरी (वय 25, रा. लष्कर परिसर) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिघांना अटक करण्यात आली आहे. सोहन, योगेश आणि सूरज यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चौधरी हे ससून रुग्णालयाच्या अपघात विभागात शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजता रुग्णांवर उपचार करीत होते. त्यावेळी एका तरुणीला फिट आल्याने तिच्यावर उपचार करण्यासाठी नातेवाइकांनी तिला ससून रुग्णालयात दाखल केले होते.

व्वा, खगोलप्रेमाला उमपा नाही! पुण्यातील 3 वर्षांच्या राध्यनीने रचला जागतिक विक्रम​

त्यावेळी रुग्णाला ठेवलेल्या कक्षामध्ये तरुणीचे नातेवाईक असलेले संशयित आरोपी चप्पल आणि बूट घालून जात होते. त्यावेळी त्यांना तेथील सुरक्षारक्षकांनी हटकले. चप्पल आणि बूट घालून आतमध्ये जाऊ नका, तसेच रुग्णाजवळ एकाच व्यक्तीस थांबण्यास परवानगी आहे, असे सांगितले. त्यावेळी तिघांनी सुरक्षारक्षकास शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यावेळी सुरू असलेला आरडाओरडा ऐकून रुग्णांवर उपचार करणारे फिर्यादी बाहेर आले. त्यांनी भांडणे सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी संशयित आरोपींनी फिर्यादी यांनाही शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्यानंतर फिर्यादींनी पोलिस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief medical officer of Sassoon Hospital was beaten by 3 youths