चिलापी 156 रुपये किलो (व्हिडिओ)

ज्ञानेश्वर रायते
सोमवार, 17 डिसेंबर 2018

भिगवणच्या मासेबाजाराला पुणे, मुंबईसह आजूबाजूच्या बाजारपेठा आहेतच, परंतु गेल्या काही वर्षांत शेजारच्या दोन जिल्ह्यांतील वाढलेले ढाबे, जेवणावळी व एकूणच खवय्यांचा थंडीत माशांना मिळणारा प्रतिसाद या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून हे भाव वाढलेले आहेत. ही वाढ कायम राहील असे वाटत नाही. तरीदेखील माशांची आवक मर्यादित असल्याने भाव तेजीत राहतील अशी स्थिती आहे.
- संदीप मल्लाव, अध्यक्ष, अंबिका मत्स्य व्यवसाय संस्था, भिगवण.

भवानीनगर (पुणे): खरंतर मार्गशीर्ष महिना म्हणजे उपवासाचा...पण थंडी खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच दरवर्षी थंडीच्या काळात माशाकडे खवय्ये वळतात...तिलापिया अर्थात उजनी धरणातील चिलापी मासा गेल्या पन्नास वर्षांचे उच्चांक ओलांडून भिगवण येथील घाऊक बाजारात चक्क प्रतिकिलो 156 रुपयांवर पोचला...फक्त चिलापीच नाही, तर वाम, मरळने 450 चा आकडा गाठला, तर गुगळी 350 रुपयांवर पोचली.

भिगवणचा मासेबाजार हा तसा अगदी पश्‍चिम बंगालमधल्या हावडा बाजारपर्यंत प्रसिद्ध आहे. भिगवणमध्ये उजनी व आजूबाजूच्या गोड्या पाण्यातील मासे विक्रीसाठी येतात. तिलापिया तसा प्रदूषण असलेल्या भागातील मासा म्हणून ओळखला जातो. मात्र तिलापिया माशाला स्थानिक मागणीही जास्त असते. तरीही त्याचा बाजारभाव आतापर्यंत उच्चांकी सव्वाशे रुपयांपर्यंत पोचलेला आहे. भिगवणच्या बाजारात आज स्थानिक मच्छीमारांनी मासेमारी करून पकडलेल्या माशाची व्यापारी, ढाबेवाल्यांना विक्री होताना चिलापीच्या भावाने मोठी उसळी घेतली. प्रतिकिलो 156 रुपये हा विक्रमी भाव त्याने गाठला. याबरोबरच मागील तीन-चार वर्षांतील उच्चांकही वाम, मरळने तोडले.

इतर माशांना मिळालेला भाव (प्रतिकिलो)
वाम : 350 ते 400 रुपये,
मरळ : 400 ते 450 रुपये
रोहू : 170 ते 200 रुपये
गुगळी : 300 ते 350 रुपये

Web Title: Chilapi fish 156 rs kg at bhigwan