

राज्यातील बालसुरक्षेचा घेतला आढावा
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची बैठक
मुंबई, ता. २२ : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची नुकतीच बैठक झाली. यात राज्यातील आश्रमशाळा, निवासी शाळा व वसतिगृहांमध्ये बालकांना सुरक्षित, निरोगी व बालस्नेही वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
आयोगाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत बालकांच्या सुरक्षिततेसह आरोग्य, शिक्षण, निवास, स्वच्छता, अन्न-पाणी, बालहक्कांचे संरक्षण आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक, सदस्य गीतांजली बुटी आदी उपस्थित होते. निवासी संस्थांमध्ये बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकारी, अधीक्षक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी २४ तास संवेदनशील व जबाबदारीने कार्य करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. वरिष्ठ स्तरावरील सूचनांची तळागाळातील यंत्रणेकडून प्रभावी अंमलबजावणी होते की नाही, याचे नियमित परीक्षण करण्याची आवश्यकता या वेळी अधोरेखित करण्यात आली. आश्रमशाळा व निवासी संस्थांमध्ये तपासणी करण्यासाठी चाइल्ड सेफ्टी ऑडिट व प्रभावी देखरेख पद्धत विकसित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यामध्ये पिण्याचे पाणी, अन्नाची गुणवत्ता, आरोग्य, स्वच्छता, सीसीटीव्ही व्यवस्था, कर्मचाऱ्यांची पडताळणी, तक्रार निवारण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचा अभिप्राय या बाबींचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली. बालकांच्या थेट संपर्कात येणाऱ्या कायमस्वरूपी, कंत्राटी व इतर कर्मचाऱ्यांचे पोलिस पडताळणी पूर्ण असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
समन्वयाने कार्यवाही
किशोरवयीन मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी व्यवस्थापन, स्वच्छता, सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता, योग्य विल्हेवाट व्यवस्था, आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय मदत या बाबींकडे विशेष लक्ष देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. पारधी, कातकरी तसेच इतर वंचित व स्थलांतरित समाजातील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे. त्यासाठी विशेष प्रयत्न, जन्मदाखला, आधार व इतर आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे शिक्षण तसेच शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले.
तपासणी समिती
बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून आश्रमशाळा व निवासी संस्थांमधील संपूर्ण सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोगाच्या वतीने राज्यस्तरीय तपासणी समिती गठित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ही समिती संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी पाहणी व तपासणी करून अहवाल आयोगास सादर करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.