बालकवींनी मांडल्या समाजाच्या व्यथा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 November 2019

कोल्हापूर-सातारा-सांगली
हे सगळं बुडालं
कोणाचे भाऊ, 
कोणाची बहीण गेली
नाही कोणाला सोडलं
गायी-म्हशींनाही रडवलं
हे सगळं अचानक घडलं..

कोल्हापूर-सातारा-सांगली
हे सगळं बुडालं
कोणाचे भाऊ, 
कोणाची बहीण गेली
नाही कोणाला सोडलं
गायी-म्हशींनाही रडवलं
हे सगळं अचानक घडलं... 
‘हे सगळं अचानक घडलं...’ ही हृदयस्पर्शी कविता नाशिकच्या पीयूष गांगुर्डे या बालकवीने सादर केली आणि सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. निमित्त होते बालदिनाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरीतील आचार्य अत्रे रंग मंदिरात आयोजित शब्दधन जीवन गौरव बालकुमार साहित्य संमेलनाचे. 
अशाच भावस्पर्शी कविता बालकवी आणि कवयित्रींनी सादर केल्या आणि ज्येष्ठ साहित्यिकही सद्‌गदित झाले. राज्यातील ७७ बालकवी, कवयित्रींनी कविता सादर केल्या. शर्विका बोडके, सबा शेख, उत्कर्षा बुधवंत, आर्या शेवाळे, ऐश्‍वर्या कुलकर्णी, गणेश पाचार्णे, आदिती वायाळ हे बालमित्र कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते. 
स्त्रीभ्रूण हत्येवर प्रहार करताना ‘गर्भातील कळी’ या कवितेतून सबा सय्यद म्हणाली, 
गर्भातील कळी बोले आईला
नको मारू गर्भात मला
होऊन जिजाबाई, 
घडवेल शिवबाला
घडवेल नव्याने महाराष्ट्राला...
दरवर्षीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेलगाव (ता. कळंब) येथून आलेला कृष्णा कांबळे याने जंगलाचे महत्त्व अधोरेखित केले. पाऊस आल्याने झालेला आनंद व्यक्त करताना तो म्हणतो,
जाऊ जंगल सफरीला
पाहू आनंदे निसर्गाला
पाऊस आला सोबतीला
फांद्या फुटलेल्या झाडाला...
ढगात वीज कडाडली
मुलांनी धूम ठोकली...
पावसा संगे पडल्या गारा..
मध्येच वारा, मध्येच गारा
जलमय झाली धरती...
उत्साहाला आली भरती...
मैत्रीचं नातं सांगताना शिवम बोराणे म्हणतो, ‘आपुलकीचा हात फिरणारी, दुःखामध्ये साथ देणारी, मैत्री ही तुझी-माझी जिवाला जीव देणारी...’ हाच धागा पकडत दुर्गेश पाटील म्हणाला, ‘काही आठवणी विसरता येत नाहीत, काही नाती तोडता येत नाहीत...’ राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बालकवी, कवयित्रींमध्ये ऋतुजा भंडारी, अनुष्का पवने, वैशाली वाळके, गौरव अनारसे, साधना शेलार, पल्लवी सपुत्रे, अंजली मोरे, गणेश बोधले, गौरी शिंदे, मैथली आपटे, आदिती रोकडे, रोहिणी धात्रक, भक्ती बुधवंत, सुमीत पाटील, अक्षरा सूर्यवंशी, दिक्षु शनवारे, स्वानंद पारखी, प्रीती पठारे, स्तुती क्षेत्रे, दीपाली लोणारे, अरविंद वीरकर, प्रांजली वीरकर, आर्या वल्लकट्टी, रेणुका लिपाने, प्रीती घोरपडे, श्रावणी रासकर, शर्वरी कर्डिले यांच्या रचनाही उल्लेखनीय होत्या. ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार साहित्य संमेलन झाले. बालकुमारांसाठी शैक्षणिक वयोगटानुसार आयोजित काव्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते झाले. 

काव्यलेखन स्पर्धेतील गुणवंत - पहिली ते चौथी : सार्थक हिंगणे (बीड), श्रीशा सोनवणे (भोसरी), आदिल पठाण (औरंगाबाद), पाचवी ते सातवी : उत्कर्षा शिरसाट (पाथर्डी), प्रगती भालेराव (कळंब), मैथिली आपटे (रत्नागिरी), आठवी ते दहावी : आकांक्षा हिंगणे (वाघोली), वैष्णवी आदलिंगे (लोहगाव), सायली अडगळे (आष्टी), अकरावी-बारावी : गायत्री खोत (पिंपरी), अंकिता वाळूंज (शिवणे), उन्नती मेहेर (वर्धा).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: childrens day