गोष्टी अन्‌ गाण्यांमध्ये रमले विद्यार्थी!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 November 2019

लेखक, कवींचा सहवास, कथा-गाणी आणि गोष्टी अन्‌ गाणी म्हणण्याचा अनोखा ‘तास’ आज विद्यार्थ्यांनी अनुभवला. कविता, गाणी-गोष्टी नुसत्या ऐकणारच नाही, तर त्याचा आनंद इतरांनाही देणार, असे सांगत या विद्यार्थ्यांनी खाऊचा आस्वादही घेतला.

पुणे - लेखक, कवींचा सहवास, कथा-गाणी आणि गोष्टी अन्‌ गाणी म्हणण्याचा अनोखा ‘तास’ आज विद्यार्थ्यांनी अनुभवला. कविता, गाणी-गोष्टी नुसत्या ऐकणारच नाही, तर त्याचा आनंद इतरांनाही देणार, असे सांगत या विद्यार्थ्यांनी खाऊचा आस्वादही घेतला.

निमित्त होते अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कारांच्या वितरणाचे. बालदिनी लेखिका रेणू गावस्कर यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. महापालिका शाळेचे विद्यार्थी आणि संस्थेच्या अध्यक्ष संगीता बर्वे, माधव राजगुरू, सुनील महाजन, माधुरी सहस्रबुद्धे, शिरीष चिटणीस हे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात बालसाहित्य लिहिणारे गणेश घुले, ल. सी. जाधव, एकनाथ आव्हाड, लेखक अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, सूर्यकांत सराफ, उमेश घेवरीकर यांना साहित्य निर्मितीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रेणू गावस्कर यांनी पुस्तक उघडणार का, वाचणार का, असे विचारत विद्यार्थ्यांना अभिनयातून गाणी, गोष्टी ऐकवल्या. सत्यजित राय यांची कथाही त्यांनी ऐकवली. त्या म्हणाल्या, ‘‘ज्यांना आई वडील नाहीत, त्यांची आई समाजाने व्हावे आणि कुणालाही आपण अनाथ आहोत असे वाटू नये, ही मोठ्यांची जबाबदारी आहे. मुलांसाठी पुस्तक म्हणजे आईची माया वाटणे, हे बालसाहित्याचे खरे यश मानावे लागेल. वाचन करणे, गोष्टी सांगणे- ऐकणे हा मोठा आनंद आहे.’’

गोडबोले म्हणाले, ‘‘बालमनाचे संगोपन करणाऱ्या बालसाहित्याचे स्थान साहित्यविश्‍वात अत्यंत महत्त्वाचे आहे. लहानपणापासून वाचन करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे मुलांनी खूप वाचावे आणि मोठे व्हावे.’’ 
बालदिन आज असला, तरी रोजचा दिवस लहान मुलांचा असला पाहिजे, असे सांगत डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, ‘‘मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांना लिहायला- वाचायला शिकविणे यासाठी मराठी बालकुमार साहित्य संस्था कार्य करत आहे.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा तोडमल यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: childrens day balsahitya award distribution