esakal | लहानग्यांसाठी खेळ अन्‌ मनोरंजनाचे कार्यक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

कर्वे रस्ता - विमलाबाई गरवारे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळा, बालवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. लहानग्यांसाठी खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि खाऊचे वाटप असे भरगच्च उपक्रम राबविण्यात आले.

लहानग्यांसाठी खेळ अन्‌ मनोरंजनाचे कार्यक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळा, बालवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. लहानग्यांसाठी खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि खाऊचे वाटप असे भरगच्च उपक्रम राबविण्यात आले.

टिळक रस्ता येथील नूतन मराठी विद्यालय मुलींची प्रशाला येथे बाल दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन शाळा समितीचे अध्यक्ष केशव वझे यांनी केले. या वेळी मुख्याध्यापिका नेहा पेंढारकर, उपमुख्याध्यापिका गीता साने, पर्यवेक्षिका संगीता कांबळे आदी उपस्थित होते. विविध मैदानी खेळांचे आयोजन केले होते. अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाचे उद्‌घाटन विद्या कांबळे यांनी केले. या वेळी डॉ. विकास आबनावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी रेखा दराडे, विनायक माने, ज्योती हिरे आदी उपस्थित होते. 

पर्यावरण संवर्धनाचा संदेश
भांडारकर रस्ता येथील विमलाबाई गरवारे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सक्षम आणि निर्भय बना, मोबाईलपासून दूर राहा, पर्यावरणाचे रक्षण करा, असे संदेश देणारी प्रात्यक्षिके सादर केली. प्रशालेच्या १६० विद्यार्थ्यांनी मैदानात ‘बाल दिन’ या अक्षराचे प्रात्यक्षिक केले. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड, मुख्याध्यापक अविनाश वाघमारे, सहायक सचिव सुधीर गाडे, भाऊ बडदे आणि कलाशिक्षक बाळासाहेब माळी आदी उपस्थित होते.

दिव्यांगांचा बालदिन मॅकडोनाल्डमध्ये
कामायनी संस्थेतील मूकबधिर आणि मतिमंद विशेष मुलांचा बाल दिन मॅकडोनाल्डमध्ये साजरा करण्यात आला. जंगली महाराज रस्त्यावरील मॅकडोनाल्ड हा कार्यक्रम झाला. या वेळी विशेष मुलांनी केक कापून पंडित नेहरूजींच्या नावाच्या घोषणा दिल्या. पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल यांनी याचे आयोजन केले होते. या प्रसंगी कामायनी संस्थेतील कालिदास सुपाते, श्रीलेखा कुलकर्णी, सागर आरोळे, अभिषेक बागूल, इम्तियाज तांबोळी आदी उपस्थित होते.