
भारतीय बालकांसाठी आजचा (ता. १४) खास दिवस. हा बालदिन कसा साजरा करायचा, याच्या योजना बऱ्याच मुलांनी मित्र-मैत्रिणींबरोबर आखायला कधीच सुरवात केली होती. कुणी फिरायला जाणार, कुणी पुस्तक खरेदी करणार, तर काही मुलांनी आवडते खेळ खेळायचे ठरवले आहे, असे मुलांशी गप्पा मारताना लक्षात आले. एका गटाच्या मुलांनी मात्र स्वतः व्हायोलिन वाजवून बालदिनाचा आनंद लुटायचे ठरविले आहे.
पुणे - भारतीय बालकांसाठी आजचा (ता. १४) खास दिवस. हा बालदिन कसा साजरा करायचा, याच्या योजना बऱ्याच मुलांनी मित्र-मैत्रिणींबरोबर आखायला कधीच सुरवात केली होती. कुणी फिरायला जाणार, कुणी पुस्तक खरेदी करणार, तर काही मुलांनी आवडते खेळ खेळायचे ठरवले आहे, असे मुलांशी गप्पा मारताना लक्षात आले. एका गटाच्या मुलांनी मात्र स्वतः व्हायोलिन वाजवून बालदिनाचा आनंद लुटायचे ठरविले आहे.
तन्वी आणि आद्या म्हणाल्या, ‘बालदिनाला आम्ही व्हायोलिनवर एक मस्त ट्यून (गत) वाजवणार आहोत.
स्वप्ना दातारताईंकडे आम्ही व्हायोलिन शिकायला येतो. त्यांना आम्ही सांगितले की, स्पेशल काही तरी शिकवा. त्यांनी भूप रागातील एक रचना शिकवली. ती आम्ही सध्या बसवत आहोत. बालदिन साजरा करायची ही कल्पना आमच्या घरीसुद्धा सगळ्यांना आवडली आहे.’
अंतरा, पार्थ, मनस्विनी व श्रुती म्हणाल्या की, या बालदिनापासून पुढच्या वर्षीच्या बालदिनापर्यंत आम्हाला ताईंबरोबर कार्यक्रमांमध्ये वादन सादर करायला मिळावे, असा हट्ट करणार आहोत. तुलिका, तनिष्का, इरा आणि दिवीज म्हणाले, ‘आमच्यापैकी काही जण जास्त दिवसांपासून व्हायोलिन शिकत आहेत. ताईंनी शिकवलेले राग भूप, दुर्गा, काफी, बागेश्री, भीमपलास, खमाज, देस, यमन हे सगळेच आवडतात. पण, आताच्या बालदिनासाठी भूपमधली जी रचना त्या आमच्याकडून बसवून घेत आहेत, ती फार गोड आहे. संगीत शिकताना असा खाऊ मिळाला की धमाल वाटते. ही रचना आम्ही क्लासमध्ये सामूहिकपणे आणि घरी एकेकट्याने मनापासून वाजवणार आहोत.’