Honey trap : ‘काउंटर इंटेलिजन्स’वर भर देण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Honey trap
Honey trap : ‘काउंटर इंटेलिजन्स’वर भर देण्याची गरज

Honey trap : ‘काउंटर इंटेलिजन्स’वर भर देण्याची गरज

पुणे : एखाद्या देशातील सैन्याच्या कामकाजाची माहिती मिळविण्यासाठी ‘हनी ट्रॅप’चा वापर ही खूप जुनी पद्धत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर युद्धाच्या स्वरूपातही बदल होत आहेत. त्यात तंत्रज्ञानाच्या गैरवापरातून काही लष्करी अधिकारी आणि जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून माहिती मिळविणे अशा घटना सातत्याने सुरू आहेत. त्यात अधिकाऱ्यांच्या तुलनेत जवानांचे प्रमाण काहीसे जास्त आहे. हनी ट्रॅपचा धोका टाळण्यासाठी इंटेलिजन्सबरोबर ‘काउंटर इंटेलिजन्स’चा वापर करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

लेफ्टनंट जनरल दत्तात्रेय शेकटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, ‘‘भारताचा दृष्टिकोन पाकिस्तानबाबत काय आहे ? यासाठी हनी ट्रॅपचा वापर केला जातो. हीच पद्धत आता चीनही वापरत आहे. भारत दोन्ही देशांचा सामना करण्यासाठी कशा प्रकारे तयारी करत आहे, तसेच शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र आदींचा साठा, आर्थिक स्थिती, सीमेवरील सैन्याची परिस्थिती, महत्त्वाची मुख्यालये, आस्थापने या सर्व गोष्टींची माहिती प्रामुख्याने घेण्यात येते. या माहितीमुळे शत्रू देशाला आधुनिक युद्धनीतीनुसार भारतावर हल्ला करण्यास मदत मिळू शकते.’’

‘‘आर्थिक गरज किंवा शारिरिक संबंध अशा विविध प्रकारच्या गरजा पाहून व त्यांचा अभ्यास करून लष्करी जवानांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले जाते. समाज माध्यमातून हा संपर्काचा उत्तम आणि सोपा पर्याय असल्याने आयएसआयद्वारे याचा वापर केला जातो. नुकतेच एका नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारच्या जाळ्यात अडकविले होते. यासाठी अधिकारी किंवा जवान जे लष्कराच्या संवेदनशील माहितीशी संबंधित आहेत, त्यांच्यावर अंतर्गत पाळत ठेवणे गरजेचे आहे’’, अशी माहिती मेजर जनरल राजन कोचर (निवृत्त) यांनी दिली.

लष्करी अधिकाऱ्यांच्या तुलनेत जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातील मुख्य कारण म्हणजेच शिक्षण. तसेच यामध्ये सर्वाधिक लिपिक आणि नव्याने सैन्यदलात भरती झालेल्या जवानांचा समावेश असतो. जवानांना हनी ट्रॅपबाबत माहिती नसते आणि लिपिकांकडे लष्कराशी निगडित सर्वाधिक माहिती असते, असे लष्करी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

काउंटर इंटेलिजन्स

सशस्त्र दलांमध्ये सुमारे १५ ते १८ लाख सैनिक आहेत. त्यातील किमान २० सैनिक जरी अशा प्रकारच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले तर त्यांच्या माध्यमातून छोटी-छोटी माहिती गोळा करणे शक्य आहे. हनी ट्रॅपच्या जाळ्यात नेमका कोणता अधिकारी किंवा जवान अडकेल हे सांगता येत नाही. यासाठी ‘काउंटर इंटेलिजन्स’ महत्त्वाचा ठरतो. लष्करी गुप्तचर विभागाकडून प्रत्येक सैनिकांवर लक्ष ठेवले जाते. तसेच त्यांना या धोक्याबाबत माहिती किंवा मार्गदर्शनाची सातत्याने गरज आहे, असे मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी सांगितले.

समाज माध्यमांचा वापर

सायबर हल्ले किंवा सुरक्षा हा जागतिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटरसह विविध प्रकारच्या ॲप्समध्ये संपूर्ण जग अडकलेले आहे. समाज माध्यम एकीकडे माहितीचा स्रोत बनत आहे, तर दुसरीकडे याचा तोटाही होत आहे. लष्करासाठी समाज माध्यमाचा उपयोग खूप आहे. मात्र त्यावर काही प्रमाणात निर्बंध लावणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर भर दिल्याने संशयास्पद मेसेज किंवा अकाउंटची पडताळणी करणे सोपे होते. याचा वापर लष्करी गुप्तचर विभागाकडून केला जातो. तसेच लष्कराची माहिती आयएसआयला पुरविणाऱ्यावर काय परिणाम होऊ शकतो, याची जाणीव लष्करी अधिकारी व जवानांना करून देण्याची गरज असल्याचे एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी सांगितले.

शत्रू देशाचे लक्ष

 • भारताचे सुरक्षा किंवा संरक्षणाच्या अनुषंगाने दूरगामी दृष्टिकोन जाणून घेणे.

 • भारतीय सैन्य अफगाणिस्तानमध्ये जाईल का ?

 • पाकिस्तानने काश्मीरमध्ये आपले काम थांबविले नाही तर, भारत पाकिस्तानच्या विरुद्ध कोणती कारवाई करेल?

 • पाकिस्तान भारतासोबत युद्धासाठी सक्षम आहे का?

या गोष्टींसाठी हनी ट्रॅपचा वापर

 • संरक्षणाशी संबंधित नियोजन करतात, त्यांची भविष्यात कशा प्रकारची वाटचाल असेल

 • देशात किती अणुबॉम्ब, लढाऊ विमान, शस्त्रास्त्र आदी गोष्टी येणार याची माहिती मिळविण्यासाठी

 • सीमेलगत भागात तैनात असलेल्या सैन्याची माहिती

 • लष्कराच्या विविध मुख्यालयातील कामांची माहिती

 • संरक्षण पद्धतीला सक्षम करणारे डीआरडीओ, आयुध कारखान्यांवर नजर

धोका टाळण्यासाठी....

 • ‘इंटरनल चेक’च्या माध्यमातून प्रत्येक अधिकारी व जवानांची माहिती संकलित करणे

 • लष्कराच्या क्षेत्रातील संवेदनशील ठिकाणी कडक तपासणी गरजेची

 • सायबर सुरक्षेसाठी उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फायरवॉल विकसित करणे

 • संगणकामध्ये अनोळखी उपकरणासाठी प्रतिबंधक प्रणाली तयार करणे

 • सुरक्षित संप्रेषण प्रणालीचा वापर

loading image
go to top