esakal | चिंकारा हरणे हे इंदापूर तालुक्याचे वैभव; त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे
sakal

बोलून बातमी शोधा

Chinkara

चिंकारा हरणे हे इंदापूर तालुक्याचे वैभव; त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर - इंदापूर तालुक्यात कडबनवडी, कळस, सोनाई दूध संघाच्या पाठीमागे, व्याहळी ते कर्मयोगी कारखाना मधला परिसर, बाभूळगाव, वरकुटे बुद्रुक परिसरात वनखात्याच्या क्षेत्रात इंदापूर तालुक्याचे प्राणी वैभव असलेली चिंकारा जातीची हजारो हरणे आहेत. मात्र त्यांचे संरक्षण व संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खरे तर रेहकुरी अभयारण्याच्याधर्तीवर येथे चिंकारा अभयारण्य पर्यटन केंद्र होणे गरजेचे आहे.

कडबनवाडी परिसरात किमान दोन हजार चिंकारा जातीची हरणे असल्याचे प्राणी अभ्यासकांचे म्हणणे आहे. मंत्रालयातील सचिव, समाजातील प्रतिष्ठित डॉक्टर्स, वकील, प्राणी अभ्यासक, इतर मान्यवर हे वनक्षेत्रात बागडणारी हरणे पहाण्यासाठी येतात. हरणांची शिकार करण्यासाठी भिवंडी, तिरवंडी येथून शिकारी येवून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे-सोलापूर महामार्गालगत बिजवडी ते बळपुडी, वरकुटे बुद्रुक व इंदापूर बारामती राज्यमार्गालगत वनक्षेत्रात चारचाकीच्या उजेडात रात्री-अपरात्री शिकारीच्या घटना घडल्याआहेत. बारामती तालुक्यात काही वर्षांपूर्वी झालेल्या शिकारीच्या घटनेत एका मंत्र्याला घरी बसावे लागले. मात्र, तरीदेखील शिकारीच्या घटनांना पायबंद बसला नसल्याचे कडबनवडी येथील शिकारी घटनेवरून दिसून येत आहे. त्यातच तपासासंदर्भात गुप्तता बारगळली जात असल्याने घटनेतील एमएच १४ पासिंग असलेल्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतील शिकाऱ्यांना अभय तर देण्यात येत नाहीना अशी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: तरूण बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने उडाली खळबळ

विशेष म्हणजे वनखात्याच्या कार्यालयापासून फक्त २०० मीटर अंतरावरच ही घटना घडली. त्यामुळे वनविभाग येणाऱ्या -जाणाऱ्या गाड्यांची नोंद घेते का, घटना घडली त्यावेळी वनविभागाचे अधिकारी तेथे नव्हते का, कोरोना काळात वनविभागाने अतिक्रमण काढताना दाखवलेली तत्परता ही आरोपी शोधण्यात का नाही, घटनास्थळानजीक असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधून काही माहिती मिळाली का, मिळालीअसल्यास का व्हायरल केली गेली नाही, आरोपी पकडण्यासाठी घटनेत वापरलेल्या चारचाकी गाडीचे किती ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, याचा जाहीर खुलासा होणे गरजेचे आहे.

तालुक्याचे वनक्षेत्र मोठे असून त्या तुलनेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, कर्मचाऱ्याकडे शस्त्र सज्जता व आधुनिक सुविधा नाहीत, वनखात्यास संरक्षण कुंपण उभा करणे गरजेचे आहे, हरणांची संख्या मोजणे, त्यांचे रक्षण व संवर्धन करणे, परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना हरणांचा त्रास होवून नुकसान होवू नये, म्हणून उपाययोजना करणे, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चिंकारा अभयारण्य व संशोधन केंद्र सुरू करून पर्यटनास चालना देणे या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्याचे वन राज्यमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा आणखी किती चिंकाराचा बळी जाणार हे काळच ठरवेल, अशी चर्चा अभ्यासकांमध्ये आहे. या संदर्भात नुतन वनक्षेत्रपाल अजित सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन कट केले.

loading image
go to top