चिन्मय मिशनचे अमृत महोत्सवी संमेलन दिल्लीत

चिन्मय मिशनचे अमृत महोत्सवी संमेलन दिल्लीत
Published on: 

चिन्मय मिशनचे अमृतमहोत्सवी संमेलन दिल्लीत
पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्‍घाटन; तीनदिवसीय संमेलन
मुंबई, ता. १५ : चिन्मय मिशनच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित ‘चिन्मय अमृत महोत्सव जागतिक संमेलना’चे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे २३ ते २५ ऑक्टोबरला होणाऱ्या या तीनदिवसीय संमेलनात सुमारे २५ देशांतील प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. स्वामी चिन्मयानंद यांचा आध्यात्मिक वारसा, वेदांताचे कालातीत ज्ञान आणि आधुनिक जीवनातील त्याची उपयुक्तता यावर संमेलनात विशेष भर दिला जाणार आहे.
चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी स्वरूपानंद यांनी या महोत्सवाची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. स्वामी चिन्मयानंद यांनी उपनिषदे, भगवद्गीता, पुराणपरंपरा आणि वेदांतातील ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जीवन समर्पित केले. चिन्मय मिशनने ७५ वर्षांत आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मुलांसाठी बालविहार, युवकांसाठी युवा केंद्र, प्रौढांसाठी वेदांत अभ्यासगट आणि मूल्याधारित शाळांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भगवद्‍गीतेतून व्यक्तिमत्त्व विकास
‘गीता पंचामृत’ या उपक्रमातून भगवद्‍गीतेतील पाच श्लोकांच्या माध्यमातून आत्मविकास, सकारात्मक विचार, भावनिक स्थैर्य आणि जीवनातील उद्दिष्टांची जाणीव निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. आधुनिक मानसशास्त्र आणि प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा समन्वय साधून भावनांचे व्यवस्थापन, मानसिक संतुलन आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक असल्याचे स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितले.
-------------
विशेष प्रदर्शन
संमेलनात आध्यात्मिक प्रवचने, विचारमंथन, भजनसंध्या, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे संगीतकार रिकी केज यांच्याशी संबंधित विशेष सांस्कृतिक सादरीकरणाचाही समावेश आहे. मिशनच्या ७५ वर्षांच्या आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेणारे विशेष प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
--------
भारतीय ज्ञानपरंपरेचा प्रसार
भारतीय ज्ञानपरंपरेचा जागतिक स्तरावर प्रसार करणे, विविध देशांतील प्रतिनिधींमध्ये अनुभवांची देवाणघेवाण घडविणे आणि भविष्यातील कार्याची दिशा निश्चित करणे, हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. शिक्षण, युवकांचा विकास, महिला सक्षमीकरण आणि समाजसेवेच्या माध्यमातून स्वामी चिन्मयानंद यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या अमृत महोत्सवातून करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com