'बारामती-दौंड-पुणे रेल्वेसेवा सुरू करा'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे बंद असलेली बारामती-दौंड-पुणे रेल्वेसेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

बारामती (पुणे) : जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे बंद असलेली बारामती-दौंड-पुणे रेल्वेसेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सर्वात स्वस्त प्रवास असलेली ही रेल्वेसेवा बारामतीकरांसाठी महत्वाची असून, या बाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे ही रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी होते आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर इतर सेवांप्रमाणेच बारामती-दौंड-पुणे ही रेल्वेसेवाही बंद करण्यात आली. ही रेल्वेसेवा असंख्य बारामतीकरांसाठी वरदान आहे. बारामतीहून दौंड व पुढे पुण्याला सकाळी जाण्यासाठी ही रेल्वे सोयीची ठरते. अनेक चाकरमाने या रेल्वेने पुण्याला जातात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा बंद होती. मात्र, आता राज्यात जवळपास सर्वच बाबी अनलॉक झालेल्या आहेत. एसटी सेवाही पूर्ण क्षमतेने करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, तशी सेवा दैनंदिन सुरू आहे. त्यामुळे आता बारामती-दौंड-पुणे रेल्वेसेवेलाही परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याशिवाय रेल्वेचेही लाखो रुपयांचे नुकसान होते आहे. 

सर्वच सार्वजनिक परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वेसही परवानगी मिळावी, अशी विनंती आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे करणार आहोत. लोकांची ही गरज आहे, रेल्वेनेही त्या बाबत विचार करण्याची आवश्यकता आहे.

- संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष, बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens demands to start baramati-daund-pune railway