कचरा निर्मूलन, स्वच्छतेला प्राधान्य द्यावे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी नागरिकांचे जगणे सुखदायी व शांततापूर्ण असावे. खड्डेविरहित रस्ते, पुरेसा पाणीपुरवठा, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असावी. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध मार्ग अवलंबवावेत.
- रमेश सरदेसाई, प्राधिकरण

पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झालेला आहे. त्यानुसार पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामेही सुरू झाली आहेत. मात्र, शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न अगोदर सोडवा, स्वच्छतेला महत्त्व द्या, नंतर स्मार्ट सिटीचा विचार करा, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

शहरात राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेबाबतच्या अपेक्षा शहरातील नागरिकांनी मांडल्या. त्यामध्ये त्यांचा भर पर्यावरण संवर्धनावर अधिक होता. चिंचवडमधील शिकंदर घोडके यांनी कचरा, झाडांचा पालापाचोळा जाळण्यावर आक्षेप घेतला. कचराकुंड्यांचा आकार लहान असावा. शहरातील अंतर्गत रस्ते मोठे असावेत, अशी अपेक्षा इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘रस्त्यावर पडलेला झाडांचा पाला-पाचोळा, रस्त्यांवरील दुभाजक, पदपथ व उद्यानांतील झाडा-झुडपांच्या फांद्यांची ठराविक कालावधीनंतर छाटणी केली जाते. मात्र, छाटणीनंतर त्या फांद्या त्वरित उचलल्या जात नाहीत. अनेक दिवस रस्त्यावरच त्या पडून असतात. त्यामुळे अस्वच्छतेत भर पडते.’’ 

शहरांतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या, फिरते विक्रेते यांच्यावर बंदी घालावी, असे मत चिंचवडमधील एका जागरूक नागरिकाने व्यक्त केले. चिंचवडच्या चापेकर चौकातील अतिक्रमणे काढण्याची मागणीही त्यांनी केली. मंदिरे व उद्यानांच्या परिसराची रात्री साफसफाई करावी. महापालिका व महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा आयोजित करावी आणि शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी महापालिका व वाहतूक पोलिस यांनी नियमितपणे एकत्रित बैठक घेऊन प्रश्‍न सोडवावेत, अशी अपेक्षा श्रीधरनगर (चिंचवड) येथील ‘जागते रहो, जगाते रहो प्रतिष्ठान’ने व्यक्त केली. 

प्राधिकरणातील विजय जगताप म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ऊर्जा स्त्रोत म्हणून सौर हिटर व सौर विद्युत ऊर्जा संयत्र बसविणे, सोसायट्यांचा कचरा सोसायटीतच जिरवणे, अशा योजनांचे प्रबोधन होणे आवश्‍यक आहे. शिवाय अशा उपक्रमांबाबत जनजागृतीही झाली पाहिजे. त्याचा प्रदूषण कमी होण्यास व कचरा निवारण्यास चांगला उपयोग होईल.’’  क्रमश: 

Web Title: Citizens expectation about Smart City