Ananat chaturdashi 2020: प्रशासनाच्या आवाहनाला पुणेकरांचा प्रतिसाद; मानाच्या, प्रमुख मंडळांभोवती पोलिसांचा बंदोबस्त

police.jpg
police.jpg
Updated on

पुणे : नदीपात्रातील प्रत्येक घाटांवर नेमलेला पोलिसांचा चोख बंदोबस्त, भाविकांची गर्दी टाळण्यासाठी प्रमुख रस्त्यांसह मोठ्या मंडळांच्या परिसरात केलेली नाकाबंदी आणि घरीच गणेश विसर्जनासाठी नागरिकांना सातत्याने केलेले आवाहन..अशा पद्धतीने पुणे पोलिसांनी घेतलेल्या विशेष खबरदारीमुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत शहरात विसर्जन सुरळीत पार पडले. त्याचबरोबर मोठ्या मंडळांभोवतीच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आल्याचे समाधानकारक चित्र मंगळवारी दिसून आले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेला यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने पार पडावा, यासाठी पुणे व महापालिका प्रशासनाकडून सुरूवातीपासूनच एकत्रित प्रयत्न केले जात होते. गणेशोत्सव मंडळांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, या दहा दिवसांच्या कालावधीत घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्यास गर्दी निर्माण होऊन कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी भिती पोलिस व महापालिका प्रशासनाला वाटत होती. त्यातूनच पहिल्या दिवसापासूनच घरच्या गणपतीचे घरी, सोसायटीच्या हौदात किंवा फिरत्या हौदात विसर्जन करावे किंवा मुर्तीदान करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जात होता. त्यास पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने पोलिस प्रशासन समाधानी होते.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या दहा दिवसात भाविकांची रस्त्यावर उतरलेली गर्दी लक्षात घेऊन विसर्जनावेळी त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून मंगळवारी पुरेपुर काळजी घेण्यात आली. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळांच्या "श्रीं'च्या जागेवरच होणाऱ्या विसर्जनासाठी नागरिकांनी गर्दी करु नये, यासाठी मानाच्या व प्रमुख मंडळांभोवतीचा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासूनच बॅरीकेडस्‌ लावून बंद करण्यात आला होता. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले.
 

 इथे केले रस्ते बंद
बहुतांश मोठी मंडळे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर येत असल्याने मंगळवारी सकाळपासूनच शिवाजी रस्ता मॉडर्न कॅफेपासून बंद करण्यात आला होता. त्याचबरोबर लक्ष्मी रस्ताही बेलबाग चौकापासून बंद करण्यात आला होता. कसबा गणपती, तांबडी जोगेश्‍वरी, तुळशीबाग गणपती, अखिल मंडई मंडळ, दगडुशेठ हलवाई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या गणपतींकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बॅरीकेडस्‌ लावून बंद केले होते. तसेच प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा जादा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बॅरीकेडस्‌मुळे मंदिरांकडे जाता न आल्याने भाविक माघारी फिरले. दरम्यान, सर्व मोठ्या मंडळांच्या श्रींचे लवकरात लवकर विसर्जन व्हावे, यासाठी मंडळांच्या परिसरात वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रयत्न करीत होते. बहुतांश मोठ्या मंडळांनी देखील पोलिसांना सहकार्य करीत मंडळांच्या आवारातील हौदातच श्रींचे विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. दरम्यान, मध्यवर्ती भागातील काही ठिकाणचे रस्ते पोलिसांनी बंद केल्याने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घाटांवर व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही चोख बंदोबस्त
म्हात्रे पुलाजवळील रजपुत झोपडपट्टीपासून ते संगम पुलापर्यंत, बाणेरपासून ते संगम पुलापर्यंतच्या वेगवेगळ्या घाटांवर नागरिकांनी गणपतीचे विसर्जन करु नये, यासाठी 258 घाटांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांसमवेत महापालिकेचे कर्मचारीदेखील उपस्थित होते. तेथेही नागरिक घाटांवर फिरकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घाट, रस्ते, मंडळ परिसरात बंदोबस्तांवर असलेल्या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून पाहण्यात आली.

पोलिस आयुक्त, सहआयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांचे विसर्जनावर लक्ष
पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी शहरातील गणेशोत्सव विसर्जन जागेवरच मात्र शांततेत पार पडावे, यासाठी बारकाईने लक्ष ठेवून होते. तर पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग, परिमंमडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्यासह पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सुहास बावचे, पौर्णिमा गायकवाड यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर उतरुन विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी प्रयत्न करत होते.


"" बहुतांश नागरिकांनी आपापल्या घरीच गणपतीचे विसर्जन केले. थोडेफार नागरिक घाटावरती येत होते. मात्र, आम्ही त्यांना समजून सांगितल्यानंतर ते माघारी जात होते. आम्ही नागरिकांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विसर्जनासाठीची व्यवस्था पाहण्याबाबतही सहकार्य करत होतो. कुठल्याही प्रकारची गर्दी झाली नाही. नागरिकांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केले.'

-संतोष वाघमोडे, पोलिस कर्मचारी, डेक्कन पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com