Loksabha2019 : रस्ता बंद करुन भाजपाची प्रचारसभा कशी? नागरिकांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथे आज (ता.20) सायंकाळी साडे सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी येथील डीपी रस्त्यावर सभामंडप उभारण्याचे काम सकाळपासून सुरु होते. हा सभामंडप टाकल्यामुळे बधाई चौक ते म्हातोबा मंदिर रस्ता बंद झाला आहे

पुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथे आज (ता.20) सायंकाळी साडे सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी येथील डीपी रस्त्यावर सभामंडप उभारण्याचे काम सकाळपासून सुरु होते. हा सभामंडप टाकल्यामुळे बधाई चौक ते म्हातोबा मंदिर रस्ता बंद झाला आहे.

''रस्ता बंद करुन अशा प्रकारे सभा कशी घेता येईल असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. इतर वेळी नियमांकडे बोट दाखवणारे पोलिस, वाहतूक पोलिस याबद्दल मूग गिळून का गप्प बसले आहेत'' ,अशी विचारणा नागरिक करत आहेत. 

कोथरूड  वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक अजय चांदखेडे यांना विचारले असता "हा निर्णय मुख्य कार्यालयातून होतो त्यामुळे, या सभेला देण्यात येणाऱ्या परवानगी बाबत मला काहीही माहिती नाही",असे सांगितले. कोथरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शंकर खटके यांनी सांगितले की," वाहतूक शाखेची परवानगी महत्वाची असते. ती पाहूनच इतर परवानग्या दिल्या जातात. यातील कायदेशीरबाबीं विषयी निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिक सांगू शकतील."

 ''मुख्य रस्ता बंद करुन सभा मंडप उभारणे हा आचारसंहितेचा भंग तर आहेच शिवाय  न्यायालयाचाही अवमान आहे. निवडणूक अधिकारी, पोलीस प्रशासन, मनपा अधिकारी झोपले आहेत का? असेच असेल तर पुढच्या वेळी राजसाहेबांची सभा आम्ही अलका चौकात का घेऊ नये?''
- सुधीर धावडे, मनसे अध्यक्ष, कोथरूड

''वाहतूक, पोलिस, अग्नीशमन आदी  सर्व परवानग्या मिळाल्यानेच आम्ही भेलकेनगर चौकात सभा घेत आहोत. वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत. नागरिकांची अडचण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे.'' 
- नगरसेवक मुरलीधर मोहोळ, भाजपा, लोकसभा निवडणुक सहप्रमुख, पुणे 

''मुख्यमंत्री या सभेला येणार असे ठरले होते परंतु एका महत्वाच्या मिटिंगला मुंबईत जावे लागणार असल्याने ते आजच्या सभेस उपस्थित राहू  शकणार नाहीत.;; असे मोहोळ यांनी सांगितले
 

Web Title: Citizen's question about why BJP Campaign by Closing the road?