esakal | अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तरुणाईच्या उपक्रमाने मिळतोय आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Help

अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तरुणाईच्या उपक्रमाने मिळतोय आधार

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे - कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) आहे, तर कोणी डॉक्‍टर, उद्योजक, व्यावसायिक. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असला, तरीही ते व्हॉट्सॲप, फेसबुकद्वारे एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यातूनच त्यांनी कोरोनाच्या (Corona) काळामध्ये अडचणीत सापडलेल्या दररोज किमान १० ते २० नागरिकांची (Public) कधी प्लाझ्मा, रेमडेसिव्हिर, कधी ऑक्सिजन बेड, रुग्णवाहिकेपासून ते रक्त पुरवठ्याची (Blood Supply) गरज तत्काळ पूर्ण केली, तेही आपल्या व्हॉट्सॲप (Whatsapp) अन्‌ फेसबुक ग्रुपद्वारे. (Facebook Group) केवळ पुणे, साताराच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे (Help) हात पुढे येत होते, प्रत्येकाची अडचण सुटत होती, प्रश्‍नातून मार्ग निघत होता. ही किमया करून दाखविली आहे ती, ‘छत्रपती मराठा साम्राज्य’ नावाच्या संघटनेने! (Citizens who are in trouble are getting support through youth initiatives)

पुण्यात ओंकार देशमुख, संदीप नवसुपे, अश्‍विनी खडतरे, स्वप्नील घोगरे, नवीन पाटील, शीतल शिंदे, दत्ता शिंदे, गणेश गायकवाड, सुनील यादव, धनराज भोसले, जितेंद्र पवार यांसारखे असंख्य तरुण त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून नागरिकांची प्रत्येक अडचण सोडविण्यासाठी धडपड करीत आहे. ‘छत्रपती मराठा साम्राज्य’ ही संघटना मागील वर्षापर्यंत केवळ मराठा समाजातील तरुणांच्या शिक्षण, नोकरी व व्यवसायांसाठी मदत करण्यापुरती मर्यादित होती. मात्र, मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनाने त्यांना जाती-धर्माच्या भिंती तोडण्यास भाग पाडले. संघटनेने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी अडचणीत सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीला तत्काळ मदत करण्यास सुरुवात केली. राज्यात, देशात व परदेशात अडकून पडलेल्या नागरिकांपासून ते त्यांच्या विविध समस्या या तरुणांनी सोडविल्या.

हेही वाचा: रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी तरुणांची ऑनलाईन दुनियादारी

निम्मी टीम पॉझिटिव्ह

नागरीकांना मदत करताना संघटनेचे निम्म्यापेक्षा जास्त तरुण सहकारी कोरोनाबाधित झाले. तरीही उर्वरित टीमने व कोरोनाबाधित झालेल्यांनीही मोठ्या धैर्याने संकटांशी दोन हात करून नागरीकांना आवश्‍यक मदत पोचविण्याचे काम सुरू ठेवले.

माणुसकीचा झरा वाहत राहिला

तरुणांनी ३०० हून अधिक नागरीकांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. एक ते दोन हजार नागरिकांना रेमडेसिव्हिर, रक्‍त, साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रुग्णालये व रुग्णवाहिका या स्वरूपाची मदत वेळेत उपलब्ध करून दिली. सर्वाधिक मदत पुणे, सातारा या जिल्ह्यातील नागरीकांना झाली. केवळ तेवढ्यावरच न थांबता वेळप्रसंगी डॉक्‍टर, काही रुग्णालये, रुग्णवाहिका, टेस्टिंग लॅब यांच्याशी संपर्क साधून त्यांचे शुल्क कमी करण्यासाठीही आग्रह केल्याने नागरीकांना दिलासा मिळाला.

जाती-धर्मामध्ये अडकण्यापेक्षा सध्या अडचणीत सापडलेल्या कोणत्याही नागरिकाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मदत करत आहोत. व्हॉट्सॲप, फेसबुकवरील ४० हजार जणांच्या ओळखीचा ठिकठिकाणी उपयोग केल्याने बळ वाढत गेले.

- ओंकार देशमुख, ॲडमिन

हेही वाचा: प्लिज! अ‍ॅम्बुलन्सचा सायरन वाजवू नका; छातीत धडकी भरते...

शिस्तबद्ध पद्धतीने काम

  • व्हॉट्स‌ॲपचे तब्बल ३५० ग्रुप असून त्याद्वारे ४० हजार जण एकमेकांशी जोडले गेले

  • पुणे, मुंबई, सातारा, औरंगाबादससह संपूर्ण राज्य, गुजरात, गोवा, मध्यप्रदेशसह परराज्य व परदेशातील मराठी नागरिकांचाही समावेश

  • प्रत्येक जिल्हा किंवा तालुकास्तरावर ३० ते ४० ग्रुप ॲडमिन, त्यावर पुन्हा काम करणारी तितकीच हुशार १०० जणांची टिम

  • यावर नियंत्रण ठेवणारी १० जणांची टीम आणि त्यांचे तीन संचालक

मदत हवी, इथे साधा संपर्क

पुणे - ९४२२९६३०३५, ९९२१४८२१७३,

पुणे/सातारा - ९४२३९६६६८६, सातारा - ९५९५३५४५२३,

नाशिक - ८९५६५६०२०२, औरंगाबाद - ९७६४०५४४४४,

गुजरात - ८४८४०६०४३१

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा