स्वच्छ शहराला अधिकाऱ्यांमुळेच खोडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

पिंपरी - शहरात शंभर टक्के स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असताना आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी मात्र अन्य विभागांमध्ये कार्यालयीन कामकाज करीत असल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे स्वच्छ शहर संकल्पनेला पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांमुळे खोडा घातला जात असल्याचे चित्र आहे. परिणामी शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छतेवर महापालिकेने भर दिला आहे. सोसायट्यांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्यांनी स्वत-च विल्हेवाट लावायची आहे. अशा सोसायट्यांना मिळकतकरात सूट देण्याचे पालिकेने जाहीर केले आहे. मात्र, शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने यांची स्वच्छता करण्यावर भर दिला आहे. आठही क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आदेश आहेत. तरीही शहरातील रस्त्यांवर कचरा दिसून येत आहे.

कचराकुंड्या वेळोवेळी उचलल्या जात नाहीत. घंटागाडी नियमितपणे येत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या आहेत. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी स्वच्छता व आरोग्य विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. त्या वेळी सफाई कर्मचारी अन्य विभागांमध्ये काम करीत असल्याचे आढळले आहे. 

आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी सफाईचेच काम करणे आवश्‍यक आहे. त्यांनी इतर विभागातील कार्यालयीन कामे करू नयेत. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांकडून अन्य कामे करून घेऊ नयेत. तसे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 
- दिलीप गावडे,  अतिरिक्त आयुक्त, महापालिका

आयुक्तांचा अधिकाऱ्यांना आदेश
आपल्या नियंत्रणाखाली कार्यरत सफाई संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज न देता त्यांच्या पदानुसार साफसफाईचे कामकाज नेमून द्यावे. त्यानंतरही सफाई कर्मचारी कार्यालयीन कामकाज करताना आढळल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई केली जाईल.

Web Title: Clean India Campaign stop by some municipal officer