'ट्रायल रूम'अभावी ग्राहक फिरवाहेत पाठ; कपड्याच्या दुकानदारांची परवड सुरुच !

Clothing shopkeeper and customer are facing problems without trial room
Clothing shopkeeper and customer are facing problems without trial room

पुणे : "हा कुर्ता फिटिंगला बरोबर बसेल ना', 
"हो, मॅडम... नक्कीच बसेल', 
"पण ट्राय नाही करता येणार का,' 
"नाही, मॅडम. कॉर्पोरेशनचा नियम आहे, त्यामुळेच ट्रायल रूम बंद ठेवली आहे,' 
"मग, घरी जावून परत येऊ का, त्यापेक्षा नंतर बघू,'
......असे संवाद सध्या तयार कपड्यांच्या दुकानात वारंवार ऐकायला मिळत आहते. लॉकडाउनच्या संकटातून आता दुकाने सुरू झाली, ग्राहकही येऊ लागले... पण कपड्यांच्या दुकानांतील ट्रायल रूम बंद असल्यामुळे ग्राहक पाठ फिरवू लागले आहेत अन त्यामुळे दुकानदारांची परवड सुरूच आहे. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

राज्य सरकारच्या नियमावलीनुसार कपड्यांच्या दुकानांतील "ट्रायल रूम'चा वापर करण्यास सध्या बंदी आहे. त्याचा फटका तयार कपड्यांच्या दुकानांना सध्या बसत आहे. एक वेळ पुरुषांचे कपडे साईज किंवा नंबरने घेतले जातात. परंतु, महिलांची खरेदी मात्र, फिटिंगवरच अवलंबून असते, असा दुकानदारांचा अनुभव आहे.

या बाबत लक्ष्मी रस्ता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राहुल बोरा म्हणाले, ""खरं तर, पावसाळ्यात 'सेल" असतो. पाच महिन्यांनंतर आत्ता कुठं ग्राहक येऊ लागले आहेत. पण, ट्रायल रूम नसल्यामुळे दुकानदार अडचणीत आले आहेत. जवळ राहणारे ग्राहक कपडे बदलून घेऊ शकतात. पण, उपनगरांत राहणाऱ्या ग्राहकांनी काय करायचे ?'' 

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

कजरी' संचालक सुरेंद्र शहा म्हणाले, ""सलवार कुर्ता, जीन्स, टॉप्स, घागरे आदींची ट्रायल घेतल्याशिवाय महिला त्यांची खरेदी करीत नाहीत. प्रत्येक ब्रॅन्डचे फिटिंग वेगळे असते. त्यामुळे त्यांना ट्रायल हवी असतेच. त्यांनी ट्रायल घरी घेतल्यावर बदलायला आल्यावर त्या कपड्यांचे फिनिशिंग गेलेले दिसते. उलगडलेली घडी पुन्हा तशी बसतही नाही.' "शालगर'चे मिलिंद शालगर म्हणाले, ""सणासुदीसाठीचे कपडे ग्राहकांच्या अंगावर व्यवस्थित बसत असतील तरच ते घेतात. ट्रायल रूमच्या नियमामुळे 40 टक्के ग्राहक परत जात आहेत. कपडे अंगाला लावून दाखविले तरी फिटिंग समजत नाही, हे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या नियमात आता सवलत द्यायची गरज आहे.'' 

ग्राहक सचिन कुलकर्णी म्हणाले, "मला जीन पॅंट घ्यायची होती. दुकानात गेलो. माझ्या साईजची पॅंट घेतली पण, ट्रायल करता आली नाही. घरी जावून ट्रायल घेतल्यावर पॅंट बदलून मिळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पॅंट न घेताच मी दुकानातून बाहेर पडलो.'' तर खरेदीसाठी लक्ष्मी रस्त्यावर आलेले करण पोरवाल म्हणाले, ""प्रॉपर साईज मिळाला तरी, फिटिंगशिवाय कसे कळणार ? घरी जावून परत यायचे म्हटले तर कामावर कधी जाणार ? खरेदी करायची का ये-जा करण्यात वेळ घालवायचा, असा प्रश्‍न पडला आहे.'' 

काळजी घेऊनही निर्बंध का ? 
दुकानात येताना कर्मचाऱ्यांची थर्मल गनद्वारे रोज आम्ही तपासणी करतो. ग्राहकांचीही तशीच तपासणी करतो. दुकानात सॅनिटायझर आहे. ट्रायल रूममध्ये तर, एकच व्यक्ती जाते. मग, त्यांच्यावर निर्बंध कशासाठी ? कर्मचारी, ग्राहक यांची तपासणी झाल्यावरच त्यांना दुकानात आम्ही घेतो. मग ट्रायल रूममध्ये बंद ठेवण्यास का सांगितले जाते ? ग्राहक सध्याही एक कपडा घेताना अन्य कपडे हाताळताच, असे बोरा यांनी सांगितले. 
 
मार्ग काढू : महापौर 
या बाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ""व्यापारी आणि ग्राहकांची अडचण रास्त आहे. सुरक्षिततेची सर्व काळजी घेवून यातून मार्ग काढणे शक्‍य आहे. त्या बाबत महापालिका नक्कीच विचार करून लवकरच निर्णय घेईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com