पुण्यात पुढील दोन दिवसांत हवामान राहणार ढगाळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही थंडीने कुडकुडत आहात ना? पण, आता परत पुण्याचे हवामान बदलतंय. आता पुन्हा थंडी विश्रांती घेणार असून, आकाश ढगाळ होण्याची शक्‍यता आहे. 

पुणे - गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही थंडीने कुडकुडत आहात ना? पण, आता परत पुण्याचे हवामान बदलतंय. आता पुन्हा थंडी विश्रांती घेणार असून, आकाश ढगाळ होण्याची शक्‍यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात चार दिवसांपासून हवामान वेगाने बदलत आहे. शिवाजीनगर येथील वेधशाळेत गुरुवारी (ता. १६) १२.१ अंश सेल्सिअस नोंदले गेलेले तापमान पुढील चोवीस तासांत सुमारे चार अंश सेल्सिअसने कमी होऊन ८.२ नोंदले गेले. यंदाच्या हिवाळ्यातील हे नीचांकी तापमान होते. पण, त्यानंतर हा घसरलेला किमान तापमानाचा पारा पुढील ४८ तासांमध्ये ४.५ अंश सेल्सिअसने वाढला. त्यामुळे अवघ्या ७२ तासांमध्ये पुणेकरांनी कडाक्‍याची थंडी ते गारठा याचा अनुभव  घेतला. 

पुढील दोन दिवसांमध्ये हवामान ढगाळ राहणार असल्याने हा गारठादेखील कमी होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला.  

पुण्यात शनिवारी (ता. १८) सरासरीपेक्षा १.४ अंश सेल्सिअस किमान तापमान कमी झाले होते. मात्र, रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ते १.७ अंश सेल्सिअसने वाढून १२.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

पुढील तीन ते चार दिवसांमध्ये शहरात आकाश ढगाळ होईल. त्यामुळे उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार आहे. त्याचा थेट परिणाम ८.२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालेला किमान तापमानाचा पारा १५ अंशांपर्यंत वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cloudy weather will be next two days in Pune