येरवडा 'तुरुंग' न राहता 'संस्कार केंद्र' बनवू; जेल पर्यटनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

मुख्यमंत्री म्हणाले की, येरवडा तुरुंगात असे काही उपक्रम राबवू ज्यामुळे येरवडा 'तुरुंग' न राहता ते 'संस्कार केंद्र' बनेल.

पुणे : येरवडा कारागृहाचा इतिहास सर्वसामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना कळावा म्हणून येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात 'जेल पर्यटन' सुरु करत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. आज या जेल पर्यटनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून केले. यावेळे त्यांनी बोलताना येरवडा कारागृहाच्या इतिहासाला उजाळा दिला. त्यांनी म्हटलं की, येरवडा तुरुंगात चाफेकर होते. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी होते. कालांतराने इंग्रज निघून गेले. मात्र, या खडतर इतिहासानेच भारत घडला आहे. जेल टुरीझम मधून दोन गोष्टी साध्य होतील. एकतर या स्वातंत्र्यासैनिकांनी घेतलेले कष्ट दिसून येतील तसेच या सगळ्यांचे झालेले हाल दिसून येतील. लोकांना त्याची जाणीव होईल. पुढे ते म्हणाले की, जेल पर्यटानातून येरवड्याच्या भींतीसुद्धा बोलू लागतील. त्या इतिहास सांगतील. आणखी मुद्दा म्हणजे या कारागृहात असलेल्या कैद्यांच्या शक्तीचा वापर कसा करायचा याचा. इथे असेलले कैदीचा म्हणजे मॅनपॉवर यांचा वापर कसा करायचा, यावर विचार करायला हवा. भरकटेलेल्या कैद्यांना मार्गावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहिल. 

पुढे ते म्हणाले की, येरवडा तुरुंगात असे काही उपक्रम राबवू ज्यामुळे येरवडा 'तुरुंग' न राहता ते 'संस्कार केंद्र' बनेल. सरकारकडून असे अभिनव उपक्रम राबवू, कि थोड्या दिवसांनी बाहेर पडणाऱ्या कैद्यांना संस्कारक्षम बनवता येईल. आणि येरवड्यातून बाहेर पडणे म्हणजे संस्कार केंद्रातून आलो असं वाटायला हवं असे जरुर प्रयोग करु, असंही त्यांनी म्हटलं. पुढे त्यांनी या जेल पर्यटनाच्या उपक्रमाबद्दल गृहमंत्र्यांचे आभार मानले. शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे. तसेच येरवडा कारागृहापाठोपाठ राज्यातील इतरही कारागृहांमध्ये अशाच प्रकारे पर्यटन सुरु करण्याचा विचार असल्याचं मंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं आहे.

हेही वाचा - 'पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मेट्रोचं बरंच काम होईल पूर्ण; राजकारण नको' - अजित पवार

भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्य स्थान आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात तसेच इतर कारागृहांतही जसे की ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करुन ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात कैद करुन ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत व ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या थोर नेत्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण देत राहतात.

काय असेल पर्यटनात?
येरवडा कारागृहास पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मुलभुत तपशील याचा उल्लेख करणे आवश्यक राहणार आहे. अधिक्षक येरवडा कारागृह यांच्या yerwadacpmh@gov.in किंवा spycppune@gmail.com या मेलवर अथवा प्रत्यक्षपणे कारागृह येथे किमान सात दिवस अगोदर अर्ज करावा लागेल. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाईल फोन, कॅमेरा, पाण्याची बाटली किंवा कोणतीही वस्तु कारागृहाच्या आतमध्ये नेता येणार नाही, याची नोंद घ्यावी. कारागृह प्रशासनाने फोटोग्राफी तसेच व्हीडीओग्राफीची व्यवस्था केलेली असुन ते कारागृहातुन बाहेर पडल्यानंतर पुरविण्यात येईल. पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्याच्या पर्यटकांची संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm Uddhav Thackeray inaugurated jail tourism at yerawada jail pune