esakal | सहकारी संस्था अडचणीत - पवार

बोलून बातमी शोधा

मांडवगण फराटा (ता. शिरूर) - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेचे स्थलांतर व एटीएम उद्‌घाटनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार.
सहकारी संस्था अडचणीत - पवार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मांडवगण फराटा - ‘‘चुकीच्या राज्यकर्त्यांमुळे सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. या सरकारकडून सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम सुरू आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेच्या स्थलांतर व एटीएमच्या उद्‌घाटनानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित केला होता, त्यात पवार बोलत होते.

ते म्हणाले, की जिल्हा बॅंकेची आर्थिक स्थिती अतिशय चांगली होती; परंतु नोटाबंदीच्या काळानंतर जिल्हा बॅंकेचे पैसे अडवल्याने सभासदांचे नुकसान झाले. या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका थेट सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोलच्या किमती नव्वदच्या पुढे गेल्या, तर गॅसच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हे सरकार केवळ जाहिरातबाजीत पटाईत आहे. या सरकारला शेतीच्या पाण्याचे नियोजन करता येत नाही. विजेचे भारनियमन सणासुदीच्या काळात सुरू केले असून, सण अंधारात साजरे करायचा का, असा सवालही त्यांनी केला. 

गांधी जयंतीदिनी सरकारने दिल्लीत शेतकऱ्यांवर अश्रुधूर, पाण्याचे फवारे मारले, इतके असंवेदनशील हे सरकार आहे. या सरकारने राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे आवाहन पवार यांनी केले.

या प्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी अध्यक्ष सुरेश घुले, प्रवक्ते विकास लवांडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

संसाराच्या वेदना फकिराला काय कळतील 
संसारी माणसानेच सरकार चालवावे, फकिराला संसारी माणसांच्या वेदनांची जाणीव काय होणार, असा टोलाही अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. वेगवेगळ्या सरकारी विभागांत अडीच लाख जागा रिक्त असून, सरकारने मात्र भरतीवर बंदी आणली आहे. नुसती ‘मन की बात’ अन्‌ ‘चाय पे चर्चा’ करून चालणार नाही, तर पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करायला हवेत, असेही ते म्हणाले.