Pune : सहकारी संस्थांनी आर्थिक वाढीत सभासदांना हिस्सा द्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी संस्थांनी आर्थिक वाढीत सभासदांना हिस्सा द्यावा

सहकारी संस्थांनी आर्थिक वाढीत सभासदांना हिस्सा द्यावा

पुणे : संस्थेच्या आर्थिक वाढीमध्ये आर्थिक उलाढालीमध्ये सभासदाचा देखील तेवढाच हक्क आणि हिस्सा असतो. पुढच्या काळात अकाउंटिंग पद्धतीमध्ये थोडासा बदल करून आपल्या नफ्यातील थोडासा लाभांश सभासदांना वाटप करताना, त्याही पुढे जाऊन त्यातील काही हिस्सा सभासदांच्या शेअर्समध्ये वापरावा, असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने जिल्हयातील ५० नागरी सहकारी बँकांमध्ये सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. सहकाराची बलस्थाने सर्वसामान्यांसमोर मांडणे ही संकल्पना घेऊन सहकार सप्ताह साजरा झाला. सप्ताहामध्ये अनास्कर यांचे ‘सहकारातून समृद्धीकडे’ या विषयावर व्याख्यान झाले. असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे यांसह असोसिएशनचे संचालक व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

अनास्कर म्हणाले,‘‘सभासद हा सहकाराचा मूळ गाभा आहे. सभासद हा सहकारी संस्थेच्या मागे ठामपणे उभा राहिला, तर जगातली कुठलीही ताकद सहकार संस्थेला संपवू शकत नाही. त्याच सोबतच प्रत्येकाची समृद्धी देखील सहकारामध्ये अपेक्षित आहे.’’ व्याख्यानमालेत रिझर्व बँकेचे जनरल मॅनेजर डॉ. अमित कुमार यांचे ‘नियंत्रकांच्या सहकारी बँकांकडून अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान झाले. तसेच सनदी लेखापाल माधव माटे, डॉ. दिलीप सातभाई, संगणक तज्ञ विजय भालेराव, बँकिंग तज्ञ विक्रांत पोंक्षे यांची व्याख्याने झाली. सप्ताहांतर्गत प्रत्येक नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीवर सहकाराचा ध्वज लावणे, सहकाराची बलस्थाने मांडणारा फलक प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर लावणे, सहकार दिनाच्या दिवशी व त्यानंतर दररोज ५० लाख खातेदारांना शुभेच्छा संदेश पाठविणे, असे विविध कार्यक्रम नागरी सहकारी बँकांमध्ये आयोजित करण्यात आले होते.

loading image
go to top