जगभरातील १५ हजार टपाल तिकिटांचा संग्रह; अच्युत इनामदार यांचा छंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

जगभरातील तब्बल १८० देशांची टपाल तिकिटे एका अवलियाने जमा केली आहेत. येथील अच्युत इनामदार (वय ७१) या ज्येष्ठाने तब्बल ५५ वर्षे अथक प्रयत्न करीत १५ हजार तिकिटांचा हा खजिना जमवला आहे. त्याबद्दल त्यांना विविध प्रदर्शनांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत.

बालेवाडी - जगभरातील तब्बल १८० देशांची टपाल तिकिटे एका अवलियाने जमा केली आहेत. येथील अच्युत इनामदार (वय ७१) या ज्येष्ठाने तब्बल ५५ वर्षे अथक प्रयत्न करीत १५ हजार तिकिटांचा हा खजिना जमवला आहे. त्याबद्दल त्यांना विविध प्रदर्शनांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील सुप्रीम पाम या सोसायटीत राहणारे इनामदार यांना टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा एक छंद आहे. सध्या त्यांच्याकडे १९४८ ते २००३ पर्यंतची टपालाची तिकिटे आहेत. त्यांच्या या संग्रहात एकूण पंधरा हजार तिकिटे असून, जगभरातील १८० देशांची टपाल तिकिटे त्यांच्याकडे आहेत. १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०१९ रोजी मुंबई येथे फिलाटेलिक काँग्रेस ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या प्रदर्शनात इनामदार यांना रौप्य आणि ब्राँझ पदक मिळाले आहे.

पुण्यात देशातील सर्वांत उंच बिल्डींगवर फडकणार 'तिरंगा'!

इनामदार यांना हा छंद वयाच्या १४ व्या वर्षी शाळेत असल्यापासून लागला. त्यांचे मूळ गाव फलटण असल्याने शाळेत जायच्या मार्गातच एक मामलेदार कचेरी होती. या कचेरीबाहेर जुनी पाकिटे टाकण्यासाठी ठेवलेली असत. मग येता-जाता तेथील तिकीट काढून जमा करायची, तर काहीवेळा मित्रांकडून ती बदलून घेत. यानंतर अकरावीत असताना मित्राबरोबर मुंबईला गेल्यानंतर तेथे टपाल तिकीट विकणारी दुकानं पाहिली आणि तिकीट खरेदी करावीत, असा विचार आला. मात्र, पैसे नसल्यामुळे त्यांना तिकिटे खरेदी करता आली नाहीत. यानंतर सांगलीला शिक्षण घेत असताना मुंबईच्या एका मित्राकडून त्यांना फिलेटिक ब्युरोमध्ये खाते उघडण्याबद्दल सांगण्यात आले. एकदा इथे खाते उघडले की टपाल खात्याकडून कोणती तिकीट सुरू केली, त्याची माहिती दिली जाते. यानंतर अभियंता म्हणून त्यांना नोकरी मिळाली. कामानिमित्त दौऱ्यावर जावे लागायचे. मग हळूहळू काटकसर करत पैसे जमवत हा छंद जोपासला.

एटीएसच्या पुण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला राष्ट्रपती पदक

१९७५ मध्ये पुण्यात आल्यानंतर हा संग्रह खऱ्या अर्थाने समृद्ध व्हायला मदत झाली. यांचे काही मित्र जे टपाल तिकीट संग्रह करतात, असे परदेशातही असल्यामुळे त्याच्याकडं टपाल तिकिटांची देवघेव करत हा संग्रह वाढवला. १९९९ ते २००१ मध्ये कामानिमित्त चेन्नईला बदली झाल्यानंतर तिथल्या साउथ इंडियन फिलटेलिक  (एसआयपीए) असोसिएशनचे सभासद झाले. या असोसिएशनकडून प्रदर्शन व तिकिटे विषयवार कशी जमा करायची, याचे मार्गदर्शन मिळाले. तोपर्यंत यांच्याकडे महात्मा गांधीजींच्या तिकिटांचा खूप मोठा संग्रह जमा झाला. त्यानंतर त्यांनी २००० मध्ये कोइमतूर येथे राज्यस्तरीय प्रदर्शनांमध्ये भाग घेतला, त्यात पदक मिळाले. त्यानंतर पुण्यात २००२ मध्ये पुणे जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि २०१२ मध्ये ‘ महापेक्‍स’ म्हणजेच महाराष्ट्र राज्यस्तरीय फिलाटेलिक प्रदर्शनामध्ये रौप्यपदक मिळाले. यानंतर मुंबईमध्ये झालेल्या फिलाटेलिक काँग्रेस ऑफ इंडिया (पीसीआय) या प्रदर्शनात इनामदार यांच्याकडून महात्मा गांधीजींचा जीवनपटच या टपाल तिकिटांद्वारे सादर करण्यात आला. हे वर्ष म्हणजे गांधींची १५० वी जयंती असल्याने या सादरीकरणाला विशेष महत्त्व होते. या प्रदर्शनात इनामदार यांना रौप्य आणि ब्राँझपदक मिळाले. 

सध्या इनामदार यांच्याकडे पक्षी, रेल्वे, जहाज या विषयावरील वेगवेगळी अशी अनेक टपाल तिकिटे आहेत. एसआयपीएचे सदस्य असल्याने या विषयी नवनवीन माहिती त्यांना मिळते आणि हा छंद अधिक प्रगल्भ करण्यास मदत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collection of 15000 postage stamps worldwide