अद्‌भुतरम्य लुकलूकणाऱ्या काजव्यांच्या महोत्सवास प्रारंभ

अद्‌भुतरम्य लुकलूकणाऱ्या काजव्यांच्या महोत्सवास प्रारंभ

भोर, ता. २ : अद्‌भुतरम्य, कुतूहलमिश्रित आणि विस्मयचकित करणारा निसर्गाचा नजराणा पाहण्याची सुवर्णसंधी निसर्गप्रेमींना अनुभवता येणार आहे. निशेच्या काळोखात अन्‌ चांदण्यांच्या मंदप्रकाशात झाडा-झुडुपांवर लक्षावधी काजव्यांच्या लखलखाटाचे बहारदार दृश्‍य आता मनाच्या कुपीत साठवून ठेवता येणार आहे. भोर तालुक्यातील नीरा-देवघर आणि भाटघर धरण परिसरात चमकणाऱ्या, लुकलूकणाऱ्या काजव्यांच्या महोत्सवात प्रारंभ झाला आहे.

मुंबई, पुणे तसेच इतर शहरांतील हौशी निसर्गप्रेमी पर्यटकांना काजवे बघता यावेत आणि रात्रीच्या निसर्गाचा अनुभव घेता यावा यासाठी भोरमधील संस्थांनी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (१ जून ते १५ जून) नीरा-देवघर परिसरात काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. भोरमधील सह्याद्री सर्च ॲण्ड रेस्क्यू फोर्स, रवी सोहम् दत्त प्रतिष्ठान आणि आम्ही  भोरकर  प्रतिष्ठानच्या वतीने पर्यटकांना मोफत मार्गदर्शन आणि मदत केली जाणार आहे.


येथे पहा अद्‌भूत दुनिया
नीरा-देवघर धरण खोऱ्यातील निगुडघर, साळव, रायरी, कंकवाडी, दापकेघर, गुढे, निवंगुन व दुर्गाडी या गावांच्या परिसरात काजव्यांची दुनिया मोठ्या प्रमाणात अवतरते. रायरेश्वरच्या पायथ्याशी वसलेल्या या गावांच्या परिसरातील झाडा-झुडुपांवर लक्षावधी काजव्यांचा लखलखाट दिसतो. या परिसरात हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर आणि बांबू अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्‌भूत खेळ पहावयास मिळतो.

डोळ्यांना सुखावणारी प्रकाशफुले
काजव्यांची झाडांवर काही क्षणाची का होईना ‘वस्ती’ असते, ती झाडे ‘ख्रिसमस ट्री’सारखी दिसतात. झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर लक्ष लक्ष काजवे बसलेले असतात. लुकलुकत होणारी काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखाऊन जातात. निसर्गप्रेमी हे कुतूहल मिश्रित आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभवाचा अनुभव घेतात.


१. भोरमधील संस्थांच्या मदतीने पुण्या-मुंबईमधील निसर्गप्रेमींना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार.
२. दररोज रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत पर्यटकांना माहिती दिली जाणार आहे.
३. पर्यटकांनी संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून वेळ निश्चित करून घ्यावी लागणार
४. पर्यटकांना प्रवासासाठी स्वतःचे वाहन घेऊन जावे लागणार आहे.
५. शिवाय अंगावर सुरक्षीत कपडे, बूट घालून हातामध्ये एक बॅटरी (टॉर्च) आवश्‍यक

ही काळजी घेणे आवश्‍यक
- काजवे पाहायला जाणार त्या ठिकाणीची खडा-न-खडा माहिती आवश्यक.
- अनोळखी ठिकाणी काजवे पाहायला जाणे टाळावे.
- अकारण मोठाले टॉर्च लावू नका.
- काजवे ज्या ठिकाणी असतील त्यापासून वाहने ५०० मीटर अंतरावर उभी करा.
- आरडा-ओरडा अजिबात करू नका.
- शांतपणे काजवे पाहावेत व आपल्या वाहनाच्या दिशेने टॉर्च न लावता निघून जावे


भोर शहरापासून १५ ते ३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वरील गावांच्या हद्दीतील काजवे पाहण्याची सुवर्णसंधी आहे. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण, घाण किंवा प्लास्टिकचा कचरा होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच डोंगरांमधील वन्य प्राण्यांपासून सावध राहून त्यांना इजा होणार नाही याकडे अधिक लक्ष
देण्याची गरज आहे. याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
- सचिन देशमुख, संचालक, सह्याद्री सर्च ॲण्ड रेस्क्यू फोर्स


03649, 23509, 23510, 23516, 03650

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com