'एमपीएससी' परिक्षेबाबत आयोगाने केली नियमावली जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पुढील महिन्यात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची नियमावली जाहीर केली आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पुढील महिन्यात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची नियमावली जाहीर केली आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यापासून ते परीक्षा देऊन बाहेर पडेपर्यंत उमेदवारांनी काय करावे काय करू नये यावर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. त्यासाठी ही नियमावली जाहीर केली आहे.
परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना उमेदवाराने तीन पदरी मास्क घालणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असे कीट उमेदवारांना दिले जाईल. दोन्ही सत्रांसाठी एकच कीट असणार आहे. 
परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.

ताप, सर्दी, खोकला असे कोरोनाची लक्षणे असल्यास संबंधित उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी,कर्मचार्यांना माहिती द्यावी. प्रत्येकाने आरोग्य सेतू' अॅप डाऊनलोड करावे. 
प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी बदलल्यास त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर व उमेदवाराला एसएमएसद्वारे दिली जाईल. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना सोशल डिस्टन्स ठेवावे, वापरलेले टिश्यु पेपर, मास्क, हातमोजे, सनिटाईझ पाऊच कचरा कुंडीतच टाकावे, अशा सूचना दिल्या आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जेवणाचा डबा सोबत आणा... 
दोन सत्रात परीक्षा होणार आहे, या काळात परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यानंतर उमेदवारास बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे जेवणाचा डबा, पाण्याची बाटली सोबत आणावी. तसेच परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commission announces rules for MPSC exams