सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध; डॉ. भागवत कराड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagwat karad
सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध; डॉ. भागवत कराड

सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध; डॉ. भागवत कराड

पुणे - वैधानिक बॅंक ऑडिट शुल्कापासून ते डिसीप्लनरी बॅंकींग संदर्भातील सनदी लेखापालांच्या (सीए) समस्यांच्या निराकरणासाठी वित्त मंत्रालय सर्वतोपरी सहकार्य करत आहे. आवश्यक वाटल्यास रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरांशी बैठक करून योग्य तो मार्ग काढू, अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली.

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने सनदी लेखापालांसोबत आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयसीएआयचे अध्यक्ष निहार जम्बुसिरीया, पुणे शाखेचे अध्यक्ष समीर लढ्ढा, डॉ. एस.बी.झावरे, अभिषेक दामने, अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते. डॉ. कराड म्हणाले,‘‘देशाच्या आर्थिक आरोग्याचे डॉक्टर म्हणून सीए कार्यरत आहेत. ते खऱ्या अर्थाने देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असतात.

हेही वाचा: प्रामाणिक करदात्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम; डॉ. भागवत कराड

म्हणून देशाच्या विकासात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांच्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी वित्त मंत्रालय नेहमीच सकारात्मक असून, आवश्यक ते सर्व पावले उचलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’ आर्थिक साक्षरता वाढावी म्हणून आयसीएआयतर्फे आर्थिक जागृती करणाऱ्या सहा चित्रफीती तयार करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे इंग्रजी वगळता ११ भारतीय भाषांमधील या चित्रफीत विविध आर्थिक विषयांवर मार्गदर्शन करतात, अशी माहिती जम्बुसिरीया यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्यात जागृती रथ -

आर्थिक सर्वसमावेशकत्व वाढावे आणि सर्वसामान्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी म्हणून वीत्त मंत्रालयाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक फिरता जागृती रथ (व्हॅन) तयार करण्यात येणार आहे. ज्या माध्यमातून डिजिटल व्यवहार, गुंतवणूक, बॅंकेतील व्यवहार आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती कराड यांनी यावेळी दिली.

loading image
go to top